

गंगापूर : संभाजीनगर -पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा येथील पतसंस्थेत पैसे गुंतल्याने त्या पंतसंस्थेची सह कंपनी सुरू आहे का? हे पाहण्यासाठी कंपनीत जात असताना तेथील सुरक्षा रक्षकाने डबल बोर बंदुकीतून छऱ्याची गोळी झाडली. यामध्ये शिवनाथ देविदास आहेर (वय ३३, रा.नगीना पिंपळगाव, ता.वैजापूर) हे बंदुकीचे छर्रे लागून जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.१६) दुपारी २:३० च्या सुमारास घडली. जखमीवर गंगापूर येथील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानराधाचे खातेदार शिवनाथ देविदास आहेर हे त्यांच्या मित्राबरोबर ज्ञानराधा मल्टिस्टेट या पंतसंस्थेत पैसे अडकल्याने या पतसंस्थेची सह कंपनी तिरुमला ऑईल मिल सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी गेले. व तिरुमला कंपनीच्या गेटच्या बाहेर उभे राहून सुरक्षा रक्षकाला कंपनीत प्रवेश करण्याची विनंती केली. यावेळी सुरक्षा रक्षक योगेश तनपुरे याने दारुच्या नशेत आहेर व त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. तसेच आपल्याकडे असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून आहेर यांच्या दिशेने गोळी झाडून त्यांना जखमी केले. याप्रकरणी योगेश बबन तनकुरे या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.