

निपाणी : तवंदी घाटात मालवाहू ट्रकने एक दुचाकी, तीन कार, तीन ट्रक अशा सात वाहनांना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात चौघे ठार, तर 10 जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घाट उतारावरील व्हाईट हाऊस आणि हॉटेल अमरसमोर झाला. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसांत झाली आहे. मृतांमध्ये खडकलाट येथील शिक्षकासह निपाणीतील महिलेचा समावेश आहे, तर जखमी पट्टणकडोली, निपाणी, गडहिंग्लज, हुबळी, सातारा येथील आहेत.
जबीन महंमदहुसेन मकानदार (वय 58, रा. दर्गा गल्ली, निपाणी), शिक्षक संतोष गणपती माने (वय 50, मूळगाव भोज, सध्या रा. खडकलाट), रेखा संजय गाडीवड्डर (वय 35, रा. खडकलाट), दिलदार आदिलशहा ताजुद्दीनमुल्ला (वय 61, रा. पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये जयेश काशिराम देसाई (वय 44), नगदा जयेश देसाई, 37 (रा. दादर, मुंबई), जितेंद्र चंद्रकांत मोहिते (वय 35, रा. सातारा), शार्दू शंकर शंकराप्पा (वय 40, रा. तेलंगणा), मंजुनाथ दत्तात्रय तेंडूलकर (वय 52, रा. हुनशी ता. हावेरी), सुपर्णा नीलकुमार नेगलूर (वय 54), श्रेया नीलकुमार नेगलूर (वय 24), परविन दिलदार आदिलशाह मुल्ला (वय 51), साफीया अहमद मुल्ला (वय 20, रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले) व नुसरा आयाज शेख (वय 8, रा. पट्टणकोडोली, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
जबीन आणि शिक्षक माने यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलदार मुल्ला व रेखा गाडीवड्डर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर जखमींवर निपाणीतील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक जितेंद्र मोहिते हा हुबळी येथून कराडकडे जात होता. तो व्हाईट हाऊस हॉटेलसमोर आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला व संतोष माने व रेखा गाडीवड्डर यांच्या दुचाकीला विरूद्ध बाजूला येऊन आदळला. दरम्यान कंटेनर व आयशर अशा दोन वाहनांना धडक देऊन ट्रक पुन्हा पूर्ववत कोल्हापूरच्या दिशेने येऊन संकेश्वर येथून पट्टणकोडोलीच्या दिशेने जाणार्या कारवर येऊन आदळला यामध्ये कारमधील जबीन मकानदार या जागीच ठार झाल्या. याचवेळी सदर ट्रकने हुबळी येथून सातार्याकडे जाणार्या समोरील कारला जोराची धडक दिली. तसेच कंटेनरला आदळत आयशरला ट्रकने धडक दिली.
अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे, अक्षय सारापुरे, निपाणीचे नगरसेवक सर्फराज बडेघर यांनी भेट देऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, रमेश पोवार आदींनी धाव घेऊन अपघातातील जखमी व मृतांची ओळख पटविली.
या अपघातामुळे बेळगावहून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती. पोलिस व रस्ते देखभाल कंपनीच्या कर्मचार्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरत सुरळीत करून दिली. मयत संतोष माने हे खडकलाट येथील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा तर जबीन मकानदार यांच्या पती, दोन मुली, मुलगा आहे.