

Youth duped of Rs 3 lakhs on the pretext of marriage
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणास गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवरी मुलीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सुदाम बांदल (२९ रा. रातंजन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा तरुण लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याची ओळख अरविंद राठोड (रा. वाशीम) याच्यासोबत झाली होती. तेव्हा राठोड याने मी तुम्हाला चांगले स्थळ पाहून देतो, असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने एक मुलगी बजाजनगरात तिच्या आई व भावासह राहते, असे सांगितल्यानतर ३० नोव्हेंबर रोजी अशोक हा चुलत भाऊ, वहिनी, आत्याचा मुलगा यांनासोबत घेऊन मुलगी बघण्यासाठी बजाजनगरातील आयोध्यानगरात आले होते.
यावेळी मायाची आई सविता शिंदे, अरविंद राठोड, बुड्डा राठोड यांच्यासमोर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शहरात १०० रुपयांच्या बाँड पेरवर मुलगा व मुलगी एकमेकाला पसंत आहेत, अशी नोटरी करण्यात आली. त्यानंतर सर्व जण सविता शिंदेच्या घरी बजाजनगर येथे आले.
तिथे ठरल्याप्रमाणे स्त्रीधन म्हणून बांदल यांनी फोन पे वरून १ लाख ४५ हजार व १ लाख ५५ हजार रुपये रोख मुलीकडच्यांना देण्यात आले.
कारमधून आलेल्यांसोबत मुलगी पसार
३ लाख रुपये स्त्रीधन देऊन अशोक हा मायाला कारमध्ये घेऊन गावाकडे निघाला होता, काही अंतरावर जात नाही तोच एका विनाक्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीने कार थांबविण्यास भाग पाडले. अशोक यांची कार थांबताच मायाने कारमधून खाली उतरत समोरच्या गाडीत जाऊन बसल्यानंतर गाडीतील चार अनोळखी इसम मायाला घेऊन तेथून पसार झाले. नवऱ्या मुलीचा फोन बंद येत असल्याने ते सर्व जण मुलीच्या घरी गेले. तिथे त्यांना कुणीच दिसून न आल्याने त्यांनी मुलीच्या आईला फोन केला, मात्र तिचा फोनही बंद येऊ लागला.