

Afghan-Pak connection of bogus female IAS
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये तब्बल सहा महिने वास्तव्य करणाऱ्या तोतया आयएएस कल्पना भागवत, तिचा अफगाणी मित्र अशरफ आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडीचे रूप घेणारा डिम्पी हरजाई या त्रिकुटाच्या चौकशीत पोलिसांच्या हाती नव्याने काही लागले नसल्याचे समोर येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून आयबी, एटीएस आणि सिडको पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र तिघेही सराईतपणे उत्तरे देत असल्याने पोलिसांची दमछाक होत आहे.
कल्पनाच्या घरी १९ कोटी रुपयांचा एक चेक आढळून आला होता. या चेकवर दोन वेगवेगळ्या शाईच्या पेनाने आणि दोन वेगवेगळ्या हस्ताक्षरात मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. अधिक माहितीनुसार, मुंबई येथील व्यावसायिक भानुशाली हे विविध ठिकाणचे कंत्राट घेतात. भानुशाली यांनी सीएसआर कामासाठी हा चेक दिल्याचे मान्य केले, मात्र त्यावर १९ कोटींची रक्कम आपण टाकली नसल्याचे आणि त्यावरील दोन्ही प्रकारची अक्षरे आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा चेक बनावट असतानाही कल्पनाने तो घरात जपून का ठेवला होता.
बँकेत तो चेक टाकला नाही. दरम्यान, हे त्रिकुट सराईत गुन्हेगारांप्रमाणे उत्तरे देत आहेत. सध्या सिडको पोलिसांच्या अटकेत असलेली मुख्य आरोपी कल्पना भागवत, मोहम्मद अशरफ खील, डिम्पी हरजाई घांच्याही उत्तरांची पद्धत एकसारखीच आहे. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती किंवा तणावाची एकही रेषा उमटत नाही. एखाद्या सराईत गुन्-हेगाराप्रमाणे किंवा आधीच ठरल्यानुसार ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढताना पोलिसांचा कस लागत आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल येरमे, एपीआय योगेश गायकवाड करत आहेत.
अशरफने पासपोर्टची मुदत वाढवली
अफगाणी कनेक्शन आणि डेटा रिकव्हरी मूळचा अफगाणिस्तानचा नागरिक असलेल्या अश्रफचा पासपोर्ट २०२२ मध्ये संपला होता, मात्र त्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २०२७ पर्यंत मुदत वाढवून घेतली आहे. तपासात असेही समोर आले आहे की, अश्रफचा भाऊ अबिद (जो सध्या पाकिस्तानात आहे) याला भारतात आणण्यासाठी अश्रफने अनेक बड्या व्यक्तींना हाताशी धरले होते.
कल्पनाच्या मोबाईलमध्ये अश्रफ आणि अबिद या दोघांच्याही पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो, तसेच अबिदच्या अर्जाचे फोटो आढळून आले आहेत.
तिघे वेगवेगळ्या कोठडीत
तिघेही आरोपी एकत्र आल्यास संगनमताने एकसारखी उत्तरे देऊ शकतात, हा धोका ओळखून पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या कोठडीत ठेवले आहे. सध्या सिडको पोलिसांसह आयबी आणि एटीएस हे तिघांची स्वतंत्रपणे कसून चौकशी करत आहेत.
मोबाईल मधील डेटा उडविला
अशरफ आणि डिम्पी हरजाई दोघांनी अटक होण्यापूर्वीच आपल्या मोबाईलमधील अनेक महत्त्वाचे पुरावे नष्ट केले आहेत. दोघांच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे.
प्रकरणातील गंभीर मुद्दे
कल्पनाच्या बँक खात्यात ३२ लाखांची उलाढाल झाली. अशरफचा पाकिस्तानमधील भाऊ गालिब यमा याच्यासोबत ती सातत्याने संपर्कात होती. त्याच्यासोबतचे चॅटिंग तिने डिलिट केल्याचे समोर आले. तिच्या मोबाईलमध्ये अपना डीलर पाकिस्तान में हैं, मालूम है ना, असा मजकूर असलेला स्क्रीन शॉट आढळून आला. तसेच पाकिस्तान आर्मीसह अफगाण दूतावास, दुबईसह ११ संशयास्पद नंबर तिच्या मोबाईलमध्ये सापडले. डिम्पी हरजाई हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ओएसडी अभिषेक चौधरी म्हणून वावरत होता.