

Doors of Shivshahi bus at depot open, question mark over security
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट बसस्थानकात मुक्कामी उभी असलेल्या शिवशाहीचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधून नराधमाने प्रवासी महिलेवर बलात्कार केला होता. या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या होत्या. परंतु याचे पालन शहरातील बसस्थानके करत नसल्याचे निदर्शनास आले असून, या घटनेनंतही प्रशासनाचा निष्काळजीपणावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्य बसस्थानकात थांबलेल्या शिवशाही बसचे दार सताड उघडे असून, त्याला केवळ दोरी बांधून संरक्षण करण्यात आले आहे. यातून सहज कोणीही बसमध्ये प्रवेश करू शकतो. असाच दरवाजा उघडा असल्याची संधी साधून स्वारगेटमध्ये भयंकर प्रकार घडला होता. त्यानंतरही एसटी प्रशासन गंभीर नसल्याने स्वार-गेट प्रकरणांची पूनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बसचा दरवाजा रात्री उशिरापासून पहाटे साडेचार, पाचच्या दरम्यान असे सताड उघडे असल्याचे आढळून आले. एसटी प्रशासनाच्या या हलगर्जीपणांमुळे प्रवाशांतही भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोरी बांधून संरक्षणाचा प्रयत्न
आगारात थांबलेल्या बसच्या दरवाजात असलेल्या दोन स्टीलच्या पाईपच्या एक दोरी बांधून संरक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, दरवाजा सताड उघडा असल्याने यातून कोणीही सहज प्रवेश करू शकतो. अनेकदा या परिसरात रात्री उशिरापर्यंत तळीरामांचा तसेच अनेक गुन्हेगारी वृत्तींच्या लोकांचा वावर असल्याच्या घडना उघडकीस आल्या आहेत.