

Young man fatally attacked with weapon over old dispute
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादातून एकाने तरुणाला रस्त्यात अडवून शस्त्राने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास औरंगपुरा भागातील शिवसेना भवनासमोर घडली. अनिरुद्ध विवेक जैस्वाल (३१, रा. कुंभारवाडा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर मनीष बाखरिया (३५, रा नंदनवन कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी विवेक लक्ष्मीनारायण जैस्वाल (५७, रा कुंभारवाडा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे घरी लॉज असून त्यासमोर आरोपी मनीष बाखरिया याचे कटलरीचे दुकान आहे. बाखरियाने दुकानासमोर रस्त्याच्या मधोमध ठेवलेला मोठा दगड जैस्वाल यांनी बाजूला ठेवला होता. तेव्हा त्याने वाद घालून शिवीगाळ केली होती.
तेव्हा पोलिस देखील आले होते. मात्र, आपसात वाद मिटला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जैस्वाल यांचा मुलगा अनिरुद्ध हा दुचाकीने जात असताना शिव-सेना भवनासमोर आरोपी बाखरियाने दुचाकीला धक्का देऊन अडविले.
त्यानंतर शिवीगाळ करून आज तुझे खतम कर ढुंगा असे म्हणत शस्त्राने मानेवर जीवघेणा वार केला. दुसरा वार देखील मानेवर होताना अनिरुद्धने तो हात आडवा केल्याने हातावर लागला. यात तो रक्तबंबाळ होऊन अनिरुद्ध गंभीर जखमी झाला.
तिथे लोकांची गर्दी झाल्याने आरोपी मनीष तेथून पसार झाला. अनिरुद्धने वडिलाना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तनपुरे करत आहेत.