

Adverse effects of homemade food on wildlife health
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : माकडे, वानर, हरिण किंवा इतर कोणत्याही वन्यजीवांना विशेषतः घरगुती किंवा रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न खायला दिल्यास गंभीर पर्यावरणीय, वर्तनात्मक आणि आरोग्याशी संबंधित दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे माकडासह अन्य वन्यप्राण्यांना घरगुती अन्न देऊ नका, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
घरगुती अन्न खाल्याने वन्यप्राण्यांचे नैसर्गिक चारा शोधण्याच्या कौशल्याचा कमी होऊन मानवी अन्नावर अवलंबून राहिल्यास प्राण्यांची नैसर्गिक अन्न शोधण्याची क्षमता कमी होते. तर वन्यप्राणी मानवांबद्दलची भीती गमावतात व लोकांच्या, वाहनांच्या किंवा घरांच्या जवळ येऊ लागतात, ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो. माकडे व इतर वन्यप्राणी मानवी अन्नाची सवय लागल्यानंतर वारंवार अन्नाची अपेक्षा करतात. अन्न न मिळाल्यास ते आक्रमक होतात, हल्ले करतात, किंवा वस्तू हिसकावतात.
मानवी अन्नावर अवलंबून राहिल्यामुळे प्राणी नैसर्गिक अन्नस्रोत शोधणे थांबवतात, त्यांची पर्यावरणातील भूमिका (उदा. बीज प्रसारक म्हणून) बाधित होते. विशिष्ट ठिकाणी अन्न सहज उपलब्ध असल्यामुळे त्या भागात वन्यप्राण्यांची अनैसर्गिक गर्दी होते. यामुळे प्रजातींमध्ये संघर्ष व ताण निर्माण होतो. मानवी वस्तीकडे आकर्षित झालेले प्राणी वनस्पतींना नुकसान पोचवतात, कचरा पसरवतात व अधिवास खराब करतात. अनेक वेळा ते लहान मुले नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.