

Government procurement of maize has been suspended for the past two days
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा :
लासूर स्टेशन येथे आधीच उशिराने शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे तहसीलचा कर्मचारी गुंतल्याने येथील खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नाचक्की झाली आहे.
शंकरपूर येथील शेतकरी तथा बाजार समितीचे माजी संचालक भिकनराव पोळ यांनी प्रसार माध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याची मागणी केली असून खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मणराव भुसारे तसेच किरण पाटील डोणगावकर आणि आमदार प्रशांत बंब यांच्याकडे देखील आधारभूत शासकीय मका खरेदी केंद्र नियमित सुरू करावे खरेदीसाठी घालून दिलेली पाचशे क्विटलची अट न ठेवता नोंदणीकृत शेतकऱ्यांची मका खरेदी चालू ठेवावी सध्या दोन दिवसांपासून खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणीबद्दल माहिती दिली असेही पोळ यांनी सांगितले आहे.
कारण खासगी व्यापाऱ्यांकडून शासकीय हमीभावापेक्षा एक हजार रुपये प्रतिक्विटल कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आधीच शासकीय हमीभावाने विकण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्याकडे दप्तरी ऑनलाइन नोंद केलेली आहे दररोजच्या मका खरेदीमध्ये वाढ करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
याबाबत खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मणराव भुसारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामात तहसीलचा शेख नावाचा कर्मचारी गुंतल्यामुळे मका खरेदी केंद्र बंद आहे आजच तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्याशी बोलणं झालं असून उद्यापासून खरेदी पूर्ववत केली जाईल अशी माहिती भुसारे यांनी दिली आहे.