Fake Hibanama Case : आधारमध्ये फेरफार करणारा झेरॉक्स चालक अटकेत

गुन्हे शाखेची कारवाई; कॅनॉटमधून संगणक जप्त; बनावट हिबानामा प्रकरण
Fake Hibanama Case
Fake Hibanama Case : आधारमध्ये फेरफार करणारा झेरॉक्स चालक अटकेतfile photo
Published on
Updated on

Xerox shop operator arrested for tampering with Aadhaar details

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हिरापूर शिवारातील शेतजमीन हडपण्यासाठी मूळ मालकाऐवजी चक्क 'तोतया' व्यक्ती उभी करून बनावट 'हिबानामा' केल्याच्या प्रकरणात टोळीतील आणखी एकाला अटक झाली. मूळ मालकाचा बनावट रबरी स्टॅम्प तयार करून देणाऱ्या आणि आधार कार्डमध्ये फेरफार करणाऱ्या सिडको कॅनॉट परिसरातील एका झेरॉक्स दुकानदाराला गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने बेड्या ठोकल्या.

Fake Hibanama Case
Jalgaon robbery news | जळगावात वाईन शॉप फोडण्याचा प्लॅन फसला; कल्याणचा सराईत 'भामटा' एलसीबीच्या जाळ्यात!

शोहेब खान सादुल्ला खान (३१, रा. गल्ली नं. १, नारेगाव) असे अटकेतील झेरॉक्स चालकाचे नाव आहे. तो सिडकोतील कॅनॉट परिसरात 'मराठवाडा एंटरप्रायजेस जम्बो झेरॉक्स' नावाने दुकान चालवतो, अशी माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. याप्रकरणी अली असगर सैफुद्दीन पेटीवाला (५८, रा. बुऱ्हाणी कॉलनी) यांची हिरापूर येथील गट क्रमांक ३१ मधील २ हेक्टर ११ आर शेतजमीन हडपण्यासाठी मुख्य आरोपी मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ आणि एजंट अब्दुल काशिद ऊर्फ जुनेद खान यांनी कट रचला होता.

त्यांनी दस्त नोंदणीच्या वेळी (दि. २७मे) मूळ मालक पेटीवाला यांच्या जागी हबीब सालेह या 'तोतया' व्यक्तीला उभे करून स्वतःच्या नावे बनावट हिबानामा नोंदवून घेतला होता. गुन्हे शाखेने यापूर्वीच मुख्य आरोपी मोहम्मद हनीफ, एजंट जुनेद आणि डमी आरोपी हबीब सालेह या तिघांना अटक केली आहे. कोठडीत असताना आरोपी हबीब सालेह याने चौकशीत कॅनॉट येथील 'जम्बो झेरॉक्स' दुकानातून फिर्यादी पेटीवाला यांच्या सहीचा बनावट स्टॅम्प बनवून घेतल्याची आणि आधारकार्डमध्ये फेरबदल केल्याची कबुली दिली.

Fake Hibanama Case
Parbhani farmer fraud : शेतकऱ्यांची साडेपाच कोटींची फसवणूक; दोन व्यापारी पसार

१५ हजारांत बनावट आधार कार्ड

रजिस्ट्री कार्यालयात तोतया इसम उभा करण्यासाठी आरोपींनी शोहेब खानची मदत घेतली. त्याने मूळ आधार कार्डवरील फोटो आणि नाव बदलून त्या जागी मालेगाव येथील तोतया इसम हबीब सालेह याचा फोटो लावला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून आधार कार्डचा क्रमांक दुसराच किंवा पूर्णपणे बनावट टाकत असे. एका बनावट कार्डसाठी तो १५ हजार रुपये उकळायचा आणि अवघ्या एका तासात कार्ड तयार करून द्यायचा. त्याने आतापर्यंत शहरातील अनेक बोगस रजिस्ट्री प्रकरणांत अशी बनावट कार्ड पुरवल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

दुकानावर छापा अन् संगणक जप्त

गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १७ जुलै) जम्बो झेरॉक्स दुकानात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना पेटीवाला यांच्या सहीचा बनावट स्टॅम्प दुकानात मिळून आला. तसेच आधार कार्डमध्ये फेरफार करण्यासाठी वापरण्यात आलेला संगणकही जप्त केले. त्यानंतर आरोपी शोहेबला अटक केली. त्याला न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सचिन देशमुख, गणेश शिंदे, अभिजित गायकवाड, परमेश्वर भोकरे, कृष्णा शिंदे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news