

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर झालेली ओळख शहरातील एका तरुणाला चांगलीच महागात पडली. बंगळुरूतील महिलेने अविवाहित असल्याचे खोटे सांगून लग्न केले. लग्नात १५ तोळ्यांचे दागिने घेतल्यानंतर तिने पतीसोबत नांदण्यास नकार दिला. त्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार ७ जून २०२३ ते ८ सप्टेंबर २०२५ या काळात गारखेडा परिसरात घडला.
रंजिता पितांबर छाबरिया (४७, रा. बंगळुरू, कर्नाटक) आणि तिचा मामा संजय माखिजा (५२, रा. सिकंदराबाद, तेलंगणा) अशी आर ोपींची नावे आहेत. फिर्यादी ४९ वर्षीय (रमेश नाव बदललेले) हे गारखेडा परिसरात वडिलांसोबत राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांची एका लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर रंजिता सोबत ओळख झाली. तिने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. रमेश अविवाहित असल्याने दोघांची लग्नाची बोलणी झाली.
तिने अनाथ असल्याचे सांगून एक बहीण आणि भाऊ तसेच मामा संजय माखिजा असा परिवार असल्याचे सांगितले होते. दोघांनी ७ जून २०२३ रोजी श्री लक्ष्मी मंदिर, बंगळुरू येथे नातेवाइकांच्या साक्षीने लग्न केले. लग्नामध्ये रमेशने रंजिताच्या अंगावर १५ तोळे सोने, सर्व कपड्याचा खर्च केला. लग्नानंतर काही दिवस दोघे बंगळुरूत नातेवाइकांकडे राहिले. तेव्हा रंजिता पत्नीप्रमाणे वागली नाही.
छत्रपती संभाजीनगरला येण्यास तिने नकार दिल्याने रमेश एकटेच निघून आले. एका महिन्यानंतर त्यांना बंगळुरूच्या पोलिसांचा फोन आला. तुमच्याविरुद्ध पत्नी रंजिताने सासरी नांदवत नसून, लग्न करून सोडून दिल्याची तक्रार दिल्याचे सांगितले. रमेश वडिलांसह ठाण्यात गेले. तेव्हा पोलिसांनी फॅमिली मॅटर आहे म्हणून समजून सांगितले. तेव्हा रंजिताने आपला संसार होऊ शकत नसल्याचे सांगितल्याने संशय वाढला.
रंजिता आणि तिचा मामा माखिजाने रमेशच्या घरी येऊन गोंधळ घातला. लग्न मोडायचे असल्याचे सांगून ५० लाखाची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच तिने खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा जवाहर नगर ठाण्यात रमेशने तक्रार केली होती.
रंजिताबाबत तिच्या शेजाऱ्यांना रमेशने विचारणा केली तेव्हा तिचा अगोदरच विवाह झाल्याचे समजले. त्यांनी ती काम करत असलेल्या एका कंपनीतुन २०१३-१४ सालची माहिती घेतली. तिच्या ईपीएफओ खात्यात तिने विवाहित असल्याचे नमूद केल्याचा पुरावाच हाती लागला. विवाहित असताना खोटे सांगून तिने आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने लग्न केल्याने जवाहर नगर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.