

Good days for the electronics market due to GST reduction
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या तोंडावर केंद्राने जीएसटी कपातीचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे ४३ इंच आणि त्याहून मोठ्या एलईडी टीव्ही आणि एअर कंडिशनर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याने इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये दिवाळीपूर्वीच धूम सुरू आहे. दरात सवलतीच्या भेटीमुळे एलईडी टीव्ही आणि एसीची डिमांड वाढून दसरा-दिवाळीत विक्रमी उलाढाल होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी दसरा-दिवाळीला इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये कोट्यवधीची उलाढाल होते. यंदा मात्र केंद्र सरकारने सर्वाधिक मागणी असलेल्या एलईडी टीव्ही आणि एसीवरील २८ टक्के जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे उलाढाल २५ ते ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जीएसटी कपातीचा थेट फायदा होऊन ५ ते १० हजार रुपये वाचणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे या निर्णयाच्या दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये विचारणा सक्रू केली आहे. ही संधी कॅश करण्यासाठी व्यावसायिकही सरसावले आहेत. ग्राहकांसाठी खास सवलत आणि ऑफरचे नियोजन सुरू केले आहे. दसरा-दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्सचा फायदा ग्राहकांना होणार आहे. सध्या ग्राहक त्यांच्या दराची चौकशी करून मॉडेलची निवड करत आहेत. सध्या पितृपक्ष असल्यान खरेदीला ब्रेक असला तरी २२ सप्टेंबरपासून शहरातील शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होऊन उलाढाल वाढेल, असा अंदाज आहे.
किमती दहा टक्क्यांनी कमी होतील ४३ इंचावरील एलईडी आणि एसीवरील जीएसटी
स्लॅब २८ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्याने किमतीही १० टक्के कमी होतील. ४० हजारांचा टीव्ही ३६ हजार रुपयांना तर ५० हजार रुपयांचा टीव्ही ४५ हजार रुपयांवर येईल, शिवाय आमच्याकडूनही सवलतीच्या ऑफर्स असतील.