

Woman accused of stealing gold after quitting work; Witchcraft by cutting lemon on head
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तब्येत बिघडल्यामुळे धुणीभांडी आणि स्वयंपाकाचे काम सोडणाऱ्या एका महिलेवर मालकीण आणि तिच्या सासूने सोने चोरीचा खोटा आळ घेतला. इतकेच नव्हे तर, महाराजांना फोटो पाठवून त्यांच्या सांगण्यावरून महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून तंत्रमंत्रासारखे अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक घटना सुराणा नगर, श्रीनिवास अपार्टमेंट येथे १६ नोव्हेंबर रोजी घडली. या अमानवी प्रकारामुळे पीडितेच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आहे.
याप्रकरणी रुपाली अमोल बाटिया आणि सविता बाटिया (दोघी रा. श्रीनिवास अपार्टमेंट, सुर-ाणा नगर) या सासू-सुनेविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायदा, अॅट्रॉसिटी आणि अन्य कलमांखाली गुरुवारी (दि. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कचरू फकीरराव घोरपडे (४२, रा. चिकलठाणा) यांची पत्नी सविता घोरपडे या रुपाली बाटिया यांच्या घरी गेल्या पाच महिन्यांपासून घरकाम करत होत्या. मात्र, सविता घोरपडे यांना पूर्वी अर्धांगवायूचा आजार झालेला असल्याने व सध्या तब्येत ठीक नसल्याने त्यांनी ५ नोव्हेंबर रोजी बाटियाच्या घरचे काम सोडले.
यानंतर अवघ्या दहा दिवसांनी, १५ नोव्हेंबर रोजी रुपाली बाटियाने सविता यांना फोन करून घरी बोलावून घेतले. रुपालीने सविता यांना सांगितले की, माझ्या घरातील एक तोळे सोने चोरी झाले आहे. तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमच्यासह इतर काम करणाऱ्या महिलांचे फोटो महाराजांना पाठवले आहेत. महाराज ज्याचे नाव सांगतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असे सांगितले.
डोक्यावर लिंबू कापून अघोरी विद्या
१६ नोव्हेंबर रोजी सविता या बाटियाच्या घरी गेल्या. तेव्हा रुपालीने घरातून लिंबू आणून सासू सविता बाटिया यांच्या * हातात दिले. सासू सविता बाटिया यांनी पीडित सविता घोरपडे यांच्या डोक्यावर हात ठेवून तंत्रमंत्रासारखे उच्चार केले आणि ते लिंबू थेट त्यांच्या डोक्यावर कापले. हा अघोरी प्रकार केल्यानंतर त्यांनी थेट सविता घोरपडे यांच्यावर संशय घेऊन जिन्सी पोलिस ठाण्यात चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला.
मानसिक धक्क्यानंतर प्रकृती खालावली
वाटिया कुटुंबाने केलेल्या या जादूटोणासदृश अघोरी प्रकाराने आणि २ खोट्या आरोपांमुळे पीडित सविता घोरपडे यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्या आधीच अर्धांगवायू आणि मेंदूविकाराने त्रस्त आहेत. अनुसूचित जातीच्या असल्याचे माहीत असूनही काम सोडल्याच्या कारणावरून त्यांच्यावर अशा प्रकारची अघोरी विद्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मानसिक धक्क्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एसीपी मनोज पगारे करत आहेत.