

Municipal election Children of ministers, MLAs and MPs in BJP-Sena are also interested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणूकीसाठी भाजपकडे ११२० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यात पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबतच पक्षाच्या आमदार, खासदारांसह मंत्री आणि नेत्यांच्या मुलामुलींचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता निवड समितीच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महापालिकेच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेच सध्या राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरण आणि स्विकृतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात तब्बल ११२० इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून या अर्जाची सध्या छाननी करून प्रभागनिहाय इच्छुकांची यादी तयार करण्याचे काम सध्या निवड समितीकडून केले जात आहे. परंतु, या इच्छुकांमध्ये भाजपमधील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुलांचेही नावे आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे या नेत्यांचा अग्रह देखील सुरू आहे. यात माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन कराड हे मागील चार वर्षांपासून भाजपमध्ये आहेत.
दरम्यान, सध्या ते पक्षाचे शहर सरचिटणीस आहेत. तर आमदार संजय केनेकर यांचा मुलगा हर्षवर्धन केनेकर हे देखील पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या यादीत असून ते मागील काही वर्षांपासून बजरंग दलमध्ये सक्रिय आहेत. एवढेच नव्हे तर गुजरातचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची मुलगी देखील भाजपकडून लढण्यास इच्छूक आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडेही इच्छुकांमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावाचा समावेश आहे.
सिद्धांत हे यापूर्वी देखील शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. तसेच यंदा आमदार प्रदीत जैस्वाल यांच्या मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांचे नावही इच्छुकांमध्ये आहे. ते युवा सेनेचे पदाधिकारी आहे.
सामान्य कार्यकर्त्यांचे काय?
प्रत्येक राजकीय पक्षात कार्यकर्त्यांमुळेच नेत्यांचा मानसन्मान असतो. कार्यकर्तेच नसेल तर नेत्यांसह पक्षाचेही भवितव्यच नसते. परंतु, कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीतही नेत्यांची मुलेच इच्छुक असतील. तर कार्यकर्त्यांच्या उमेदवारीचे काय, त्यांची निवड कोणत्या मेरीटनुसार पक्ष करेल, हा देखील एक प्रश्नच आहे.