

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आमच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचा दावा करीत आहेत. प्रत्यक्षात भाजप, शिवसेना वगळता इतर पक्षांची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. भाजपकडे उमेदवारीसाठी दोन दिवसांत तब्बल ११२० इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून शिवसेना शिंदे गट आजपासून तर ठाकरेसेना आठवडभरानंतर इच्छुकांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करणार आहे. मात्र, कॉंग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच चिंतेत आहे. प्रक्रिया सुरू करून १५ दिवस उलटूनही त्यांच्या इच्छुकांचा आकडा ३०० वर सरकण्यास तयार नसल्याने अजूनही प्रतीक्षेतच आहेत..
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल १० वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक माजी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आमच्याकडे सर्वाधिक इच्छुक असल्याचा असा दावा करीत आहेत. परंतु, इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता वेगळेच चित्र दिसत आहे. शहरात दोन आठवड्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज विरतण आणि स्विकृतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु, १५ दिवस उलटूनही २९ प्रभागातील ११५ वॉर्डासाठी इच्छुकांचा आकडा ३०० वर गेलेला नाही. हीच स्थिती काँग्रेसची असून मागील आठवडाभरात त्यांना २८५ अर्जच प्राप्त झाले आहेत.
परंतु, भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. दोन दिवसांत त्यांच्याकडे २९ पैकी २४ प्रभागांसाठी तब्बल ११२० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना शिंदे सेनेकडेही इच्छुकांचा अधिक कल दिसत आहे. तर ठाकरे सेना अजूनही प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रतीक्षाच करीत आहे. एमआयएमसह वंचित बहुजप आघाडीनेही अर्ज स्विकृती सुरू केली आहे.