

Will the 'Hirakani Kaksha' (nursing/lactation room) be demolished to make way for offices for office-bearers?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दालने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असून आता हिरकणी कक्षाच्या जागेवर मुख्य आवक-जावक विभाग सुरू करण्याचा पर्याय पुढे आला आहे. या जागेवर कार्यालय सुरू करण्यासाठी कक्षात बदल अथवा तोडफोड होण्याची शक्यता असल्याची माहती सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या दालनांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्तनदा मातांसाठी उभारलेल्या सुविधेवरच गदा येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य, पदाधिकारी आणि गटनेत्यांना मुख्य इमारतीत स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. एका पक्षाच्या गटनेत्याला मुख्य आवक- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जावक विभागाचे दालन देण्याची चर्चा सुरू असल्याने या विभागासाठी पर्यायी जागेची शोधाशोध सुरू झाली आहे. त्यातूनच प्रांगणातील हिरकणी कक्षाच्या जागेचा पर्याय पुढे आला आहे.
महापालिकेत स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी आणि बालकांची काळजी घेण्यासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र, हा कक्ष गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. आता याच जागेवर मुख्य आवक-जावक विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने महिला व बालकांसाठी असलेल्या सुविधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकीकडे कक्ष बंद, तर दुसरीकडे त्याच जागेवर कार्यालय सुरू करण्याची तयारी, अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेत गेल्या सहा वर्षांपासून प्रशासक राजवट होती. या काळात जुन्या दालनांमध्ये विविध कार्यालये सुरू करण्यात आली, तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त दालने तयार करण्यात आली.
आता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र दालने देताना प्रशासनाला जागांची जुळवाजुळव करावी लागत आहे. दालनांच्या वाटपावरून यापूर्वीही दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यालयीन जागेचा प्रश्न आता राजकीय रस्सीखेचीत अडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाखो रुपये खर्चुन शौचालयाची इमारत उभारण्यात आली आहे.
एका बाजूला नव्या इमारतींवर खर्च होत असताना दुसरीकडे उपलब्ध सुविधांमध्ये बदल करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच कार्यालयीन जागांचे योग्य नियोजन झाले असते, तर महिला व बालकांसाठीच्या सुविधेचा पर्याय म्हणून विचार करण्याची वेळ आली असती का, अशी चर्चाही सुरू आहे.
स्तनदा मातांची गैरसोय होण्याची शक्यता
हिरकणी कक्ष नियमित सुरू ठेवणे ही महिला व बालकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. कक्ष बंद असेल तर तो पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. मात्र त्याच जागेचा वापर कार्यालयासाठी झाल्यास स्तनदा मातांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनांचा प्रश्न सोडविताना हिरकणी कक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.