Sambhajinagar News : मराठवाड्यातील १०० कंपन्यांना भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी प्रोत्साहन

सीएमआयए', बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यात सामंजस्य करार
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मराठवाड्यातील १०० कंपन्यांना भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी प्रोत्साहनfile photo
Published on: 
Updated on: 

100 Marathwada companies encouraged to get listed in the capital market

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील उद्योगांना भांडवली बाजाराच्या माध्यमातून निधी उभारणीच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (सीएमआयए) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्यांतर्गत चालू आर्थिक वर्षात मराठवाड्यातील १०० कंपन्यांना भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्याच्या संधींचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच आर्थिक साक्षरता, गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थांसाठी निधी उभारणीबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. मुंबई येथे २२ ऑक्टोबर रोजी हा करार करण्यात आला.

बीएसई लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी बीएसईच्या इश्यूअर रिलेशन्स अँड कॉर्पोरेट सेल्स विभागाच्या प्रमुख राधा कीर्तिवासन, एसएमई विभागाचे प्रमुख वरुण गुप्ता आणि उपाध्यक्ष रिद्धेश शाह तर सीएमआयएच्या वतीने अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे, सीए सोहम कोटक,

वाळूज विभागप्रमुख हर्षित मोदाणी, बिझनेस फॅसिलिटेशन सेल प्रमुख रविश सोनी, मराठवाडा विभागप्रमुख अनुज बन्सन आदी पदाधिकारी उपस्थित होते. सीएमआयए आणि बीएसई यांच्यातील या सहकार्यामुळे मराठवाड्यातील उद्योगांना भांडवली बाजारातून निधी उभारणीच्या पर्यायांची माहिती मिळेल, नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढेल आणि सामाजिक संस्थांसाठी निधी उभारणीच्या नव्या मार्गाबाबत जागरूकता निर्माण होईल. या उपक्रमातून मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक जागरूक आणि माहितीपूर्ण सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

असे असेल कामाचे स्वरूप....

या करारांतर्गत, मराठवाड्यातील पात्र कंपन्यांना बीएसईच्या मुख्य बाजारपेठेत तसेच एसएमई प्लॅटफॉर्मवर प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवल उभारणीच्या संधींची माहिती देण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांसाठी आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम राबविण्यात येतील, शेअर बाजाराची मूलभूत माहिती, आर्थिक नियोजन, गुंतवणुकीतील जोखीम आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या पद्धती याविषयी जागरूकता निर्माण केली जाईल.

तसेच सायबर फसवणूक, बनावट ट्रेडिंग ऍप्स आणि अवास्तव परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या पात्र सामाजिक संस्थांना बीएसईच्या सोशल स्टॉक एक्स्चेंज (एसएसई) या व्यासपीठाची माहिती देण्यात येईल. या माध्यमातून ना-नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या संस्थांना पात्रतेचे निकष, निधी उभारणीची प्रक्रिया आणि उपलब्ध पर्याय समजून घेण्यास मदत केली जाईल. परिणामी, सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक संसाधने उभारण्याच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news