

Water project work will now continue even at night
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर आता स्थानिक पातळीवर ही योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर अखेरपर्यंत नवीन जॅकवेलमध्ये किमान दोन पंप बसवून सुमारे दोनशे एमएलडी पाणी आणता यावे, यादृष्टीने रात्रंदिवस काम करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२९) पाणी योजनेसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक विनय राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
सद्यस्थितीत पाणी योजनेचे ८३ टक्के काम झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करु असे ठेकेदार कंपनीने याआधी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत पाणी योजनेची आढावा बैठक घेऊन सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत योजना कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार आजच्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी ठेकेदार कंपनी आणि जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. परंतु योजना मोठी असल्याने त्यासाठी वेळ लागणार आहे. तरीही आक्टोबर अखेरपर्यंत ही योजना अंशतः कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने कामाला लागण्याचे आणि त्यासाठी योजनेचे काम दिवसासोबतच रात्रीही सुरू ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.
जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी काही महिने लागणार आहेत. परंतु ऑक्टोबर अखेरपर्यंत जास्तीत जास्त काम करून जॅकवेलमध्ये किमान दोन पंप बसवून पाणी उपसा सुरू करण्यात यावा आणि त्यातून शहराला २०० एमएलडी पाणी द्यावे, असे गावडे यांनी सांगितले.
पाणी योजनेच्या प्रगतीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आ लेली आहे. या समितीच्या महिन्यातून दोन बैठका होतात. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या गेल्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात अशा २२ बैठका झाल्या आहेत. गावडे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने पाणी योजनेची ही त्यांची शेवटची बैठक होती. गावडे यांच्या पहिल्या बैठकीवेळी पाणी योजनेचे ५४ टक्के काम झाले होते. आता हे काम ८३ टक्क्यांपर्यंत गेले आहे.