

Robber Gangane's wife and father-in-law arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यात १५ मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकून सहा जणांनी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी, रोख ७० हजार लुटून नेले होते. या घटनेनंतर गुन्हे शाखेने २६ मे रोजी अमोल खोतकरचे एन्काउंटर केले तर पाच दरोडेखोरांना अटक केली होती. त्यानंतर टीप देणारे आणखी पाच जणांना निष्पन्न करून बेड्या ठोकल्या. दरम्यान, यातील अंबाजोगाईचा कुख्यात दरोडेखोर सुरेश गंगणेच्या पत्नी आणि सासऱ्याला शनिवारी (दि.३१) रात्री अटक केली. गंगणेने सोने विकून दोघांना दिलेले ८ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले.
बबीता सूर्यकांत ऊर्फ सुरेश गंगणे (३०, रा. कुत्तर विहिरीजवळ आंबेडकर चौक, अंबाजोगाई) आणि भारत नरहरी कांबळे (५०, रा. मोटेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि निरीक्षक संदीप गुरमे यांनी रविवारी (दि.१) दिली. या गुन्ह्यात आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे. घटनेला १७दिवस उलटून पोलिसांच्या हाती साडेपाच किलो सोन्यापैकी केवळ ३२ तोळेच सोने लागले आहे. उर्वरित सोने-चांदीचे गौडबंगाल कायम आहे.
अधिक माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३०) गुन्हे शाखेचे एपीआय विनायक शेळके आणि पीएसआय संदीप सोळंके सुरेश गंगणे भारत कांबळे यांचे पथक आरोपी सुरेश गंगणेच्या अंबाजोगाई येथील घरी गेले. त्याची पत्नी बविताची चौकशी केली तेव्हा तिने सुरेश हा २० दिवसांपूर्वी तिचा मोबाईल घेऊन सोबत घेऊन बाहेरगावी गेला होता.
त्यानंतर तो पाच सहा दिवसांनी परत आला. त्याने मोबाईल वविताकडे देऊन आठ लाख रुपये दिले. तिने विचारले तेव्हा सुरेशने छत्रपती संभाजीनगर येथे चोरी करून सोने मिळाले होते. ते सोनाराकडे विक्री करून पैसे आणल्याचे सांगितले. तसेच बबिताकडे ३ लाख तर तिचे वडील भारत कांबळेकडे पाच लक्ष रुपये असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन वडिलांनाही अटक केली. मोबाईलही जप्त केला. बबिता आणि तिचे वडील कांबळे दोघेही सोने कोणाला विक्री केले. चांदीची भांडी कुठे आहेत, याबाबत काहीही सांगत नसल्याने त्यांना अटक करून शहरात आणण्यात आले. कांबळेला न्यायालयात हजर केले असता ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर गंगणे हा मोक्का मधील कुख्यात गुन्हेगार असून, लड्न यांच्या बंगल्यात दरोडा टाकला तेव्हा दोन पिस्तूलने धमकावण्यात आल्याचे समोर आले. ते दोन्ही पिस्तूल अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. तर बविता हिला मधुमेहाचा त्रास वाढल्याने घाटीत भरती करण्यात आले. तिला पोलिसांनी तिथेच स्थानबद्ध केले आहे.
गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांनी दरोडेखोर अमोल खोतकरचे वडगाव कोल्हाटी येथे एन्काउंटर केले. त्याचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सूत्रानुसार, एन्काउंटर झालेल्या कारमध्येही काही रोख रक्कम आणि सोने आढळून आल्याचे समोर आले आहे. सोने आणि रोख रक्कम किती याची माहिती गुन्हे शाखेने सीआयडीकडे पत्र देऊन मागितली आहे.
लड्डन यांच्या दाव्यानुसार साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी दरोडेखोरांनी लुटून नेली. तपासात गुन्हे शाखेने आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली. मात्र केवळ ३२ तोळेच माहितीनुसार सोने साडेपाच किलो होते का, याबाबतच पोलिसांना आता शंका वाटत आहे. आरोपींची कसून चौकशी करूनही सोने गेले किती हे समोर येऊ शकले नाही. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दरोडेखोरांच्या संपर्कात असलेल्या एका पोलिस निरीक्षकाचे नाव लवकर समोर येईल, असे म्हणत खळबळ उडवून दिल्याने गुंता आणखीच वाढत आहे.