

Voting today at 33 centers in Gangapur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने भव्य आणि काटेकोर तयारी पूर्ण केली आहे. शहरातील १६ इमारतींमध्ये ३३ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, एकूण २९,२८७ मतदार आज निवडणुकीत मतदानाचा हक्क बजा-वणार आहेत. यामध्ये १४,८८४ पुरुष, १४,३९७ महिला आणि ६ इतर मतदारांचा समावेश आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी आणि १ शिपाई अशी नियुक्ती करण्यात आली असून, एकूण १३२ नियमित तसेच ४० राखीव कर्मचारी मिळून १७२ कर्मचारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणार आहेत. मतदानासाठी प्रत्येक बूथवर १ कंट्रोल युनिट आणि २ बॅलेट युनिट देण्यात आले आहेत. ३३ केंद्रांसाठी ३३ कंट्रोल युनिट आणि ६६ बॅलेट युनिट तर अतिरिक्त वापरासाठी १० कंट्रोल युनिट आणि २० बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले आहेत.
निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी दोन स्थिर पथके आणि चार भरारी पथके तैनात आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य सुपूर्द करण्यात आले. दुपारी गंगापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वागवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष आगळे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, तालुका कृषी अधिकारी वापूराव जायभाये, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, स्वप्निल लघाने व उदय जराड यांच्या उपस्थितीत १० खासगी वाहनांतून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान सुरळीत व सुरक्षित राहावे यासाठी पोलिस दलाकडून मजबूत बंदोबस्त करण्यात आला आहे. यात ९ दुय्यम पोलिस निरीक्षक, ७७ पोलिस कर्मचारी, ५० होमगार्ड व १६ सीएपीएम जवानांचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांनी दिली.
१८ नगरसेवकांसाठी होणार मतदान
या निवडणुकीत १० प्रभागांतून २० नगरसेवक निवडायचे होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदे शानुसार प्रभाग ४ व मधील एक व प्रभाग ६ व मधील एक-अशा दोन जागांच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज नगराध्यक्ष व केवळ १८ नगर-सेवक पदांसाठीच मतदान होणार आहे.