

Inconsistencies in land records, farmers question tehsildar
गंगापूर : पुढारी वृत्तसेवा : माझी शेती बागायती दाखवलीय की जिरायती ? असा थेट आणि रोखठोक सवाल एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना करताच वातावरण क्षणभर तंग झाले. शासनाच्या नोंदीतील विसंगतीमुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली.
सदर शेतकरी शेतीविषयक कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात आले असता ७/१२ उताऱ्यातील तपशील चुकीचा असल्याचे त्यांना समजले. प्रत्यक्षात माझ्या शेताला पाण्याची सोय नाही, मग बागायती नोंद कशी? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थित इतर शेतकऱ्यांनीही जमिनीच्या नोंदीतील चुका दाखवत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी अधिकारी
थोडेसे गोंधळले असले तरी त्यांनी तात्काळ नोंदी तपासण्याचे आश्वासन दिले. मात्र जमीन नोंदीतील गोंधळामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत, अनुदान आणि विमा योजना मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार अनेकांनी केली. महेश गुजर या शेतकऱ्याने नोंदी दुरुस्त करा, अन्यथा पुढचा लढा रस्त्यावर उतरून देऊ ! असे म्हटले आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाची अडचण वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.