

Villagers catch three people who broke into the temple's donation box
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : भरदिवसा मंदिराची दानपेटी फोडणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. ही घटना तालुक्यातील पालोद येथील नागझरी मंदिरात बुधवारी (दि. १३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
ज्ञानेश्वर शिवाजी ढोले (४२, रा. करंजखेड, ता. कन्नड, ह.मु. गणेश कॉलनी, सिल्लोड), माणिक ऊर्फ भावड्या शालीकराम गाडेकर (३०, रा. चिखली दाभाडी, ता. भोकरदन, ह. मु. म्हसोबा गल्ली, सिल्लोड), राम मुरकुटे (रा. सिल्लोड) असे पकडलेल्या आर-ोपींची नावे आहेत.
पालोद येथे नागझरी मंदिर आहे. सध्या श्रावण सुरू असल्याने भक्तांची रेलचेल आहे. दुपारी वरील तिघे जण मंदिरात दर्शनासाठी आले. मंदिर परिसरात कुणी नसताना त्यांनी दानपेटी फोडून त्यातील अंदाजे एक हजार रुपये घेऊन पसार होत होते. या दरम्यान त्यांना एका भाविकाने पाहिले व आरडाओरडा केली. परिसरातील ग्रामस्थ तेथे जमा झाले.
तिघे जण पळून जात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व ही माहिती पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मंदिराचे पुजारी युवराज रामलाल ढोले (रा. कोपर्डा, ता. भोकरदन) यांनी फिर्याद दिली. पुढील तपास बिट जमादार सचिन काळे करीत आहेत.