Tadoba Tiger Death | ताडोबाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा बळी! रेल्वेच्या भीषण धडकेत वाघाचा जागीच अंत

Tadoba Tiger Death | रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळेच आणखी एका वाघाचा बळी? सिंदेवाहीत तणावाचे वातावरण
Tadoba Tiger Death
Tadoba Tiger Death
Published on
Updated on
Summary
  1. सिंदेवाही–राजोली रेल्वे स्थानकादरम्यान वाघाचा मृत्यू

  2. भरधाव मालगाडीची धडक बसल्याची प्राथमिक माहिती

  3. वन विभागाकडून पंचनामा आणि तपास सुरू

  4. मृत वाघाची ओळख आणि क्षेत्र तपासण्याचे काम सुरू

  5. वन्यजीवांसाठी सुरक्षित रेल्वे कॉरिडॉरची मागणी पुन्हा जोरात

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया–नागभीड–बल्लारशा रेल्वेमार्गावरील सिंदेवाही–राजोली रेल्वे स्थानकादरम्यान एका वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून भरधाव मालगाडीची जोरदार धडक बसल्याने वाघ जागीच मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Tadoba Tiger Death
India Population Trends | दक्षिण भारत वृद्धत्वाकडे, हिंदी पट्टा लोकसंख्या स्फोटाच्या छायेत!

ही घटना सिंदेवाही–राजोली रेल्वे मार्गावरील क्रमांक 1181/8 परिसरात घडली. सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू करण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव मालगाडी त्याच्यावर आदळली. धडक इतकी भीषण होती की वाघाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

सध्या मृत वाघाचे वय, लिंग आणि तो कोणत्या वनक्षेत्रातील आहे याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित वाघाचा हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील कॅमेरा ट्रॅप आणि वन विभागाच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देशभरात प्रसिद्ध आहे. या परिसरातील जंगलातून अनेक रेल्वेमार्ग जात असल्याने वन्यजीवांची सतत वर्दळ असते. विशेषतः वाघ, बिबटे, अस्वल आणि रानडुक्कर यांसारखे प्राणी वारंवार रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतात. त्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये वन्यजीवांचे बळी जाण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत.

Tadoba Tiger Death
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करा; जयंतराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

या घटनेनंतर पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर वेगमर्यादा लागू करणे, संवेदनशील भागांमध्ये अलर्ट यंत्रणा उभारणे आणि वन्यजीवांसाठी सुरक्षित कॉरिडॉर विकसित करणे आवश्यक असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन आणि वन विभागाने अधिक समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे अपघातात अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या घटनांकडे केवळ अपघात म्हणून न पाहता वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीरपणे विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news