Verification of students in schools has begun
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हेड काऊंटची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १६५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. शाळेला भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या तपासण्याचे काम या पथकांकडून केले जाणार आहे.
राज्यस्तरावरून राज्यात लवकरच एकाचवेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळली जाणार आहे. त्याआधी केंद्रप्रमुख स्तरावरून शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यात ही खातरजमा करण्यासाठी १६५ पथकांची स्थापना केली आहे. सध्या या पथकांकडून शाळांना भेटी देऊन तिथे उपस्थित विद्यार्थी, यू डायसवर नमूद विद्यार्थी संख्या, सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी याची माहिती तपासण्यात येत आहे.
राज्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संचमान्यता यू डायस प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. त्याकरिता यू डायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता विचारात घेतली जाणार आहे. मात्र या माहितीत तफावत असू शकते किंवा त्यात खोटी माहिती भरलेली असण्याची शक्यता असल्याने केंद्रप्रमुख स्तरावरून आता या माहितीचे प्रमाणिकरण व सत्यता पडताळणीचे काम केले जात आहे.
पडताळणीबाबत गुप्तता
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या पडताळणीबाबत गुप्तता बाळगली जात आहे. पडताळणीसाठी स्थापन केलेल्या प्रत्येक पथकात एक केंद्र प्रमुख आणि दोन इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागात ही पडताळणी सुरू झाली आहे. महापालिका हद्दीतही येत्या एक ते दोन दिवसांत ही पडताळणी सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिक्षकांच्या पदांवर होणार परिणाम
सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची पदसंख्या विद्यार्थी संख्येवरून ठरत असते. त्यालाच संचमान्यता म्हणतात. बऱ्याचवेळा शिक्षकांची पदे कमी होऊ नयेत म्हणून शाळांकडून विद्यार्थी संख्या वाढवून दाखविली जाते. त्याला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधारकार्ड प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे. शिवाय आता प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी संख्याही तपासण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या पदांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
जिल्ह्यात चोवीसशे शाळांमध्ये तपासणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २०९० शाळा आहेत. तर अनुदानित खासगी शाळांची संख्या ही २९५ इतकी आहे. या शाळांमधून सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आता या सर्व शाळांमध्ये केंद्रस्तरीय पथके जाऊन तपासणी करणार आहेत.