

First he was stabbed in the hand with a blade and then he hanged himself
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : दारूच्या आहारी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने रांजणगाव येथे आधी स्वतःच्या हातावर ब्लेडने वार केले. त्यानंतर राहत्या घरात झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आली. सुनील दशरथ खरात (२८, रा. करनखेड, ता. चिखली ह.मु. गांधीनगर, रांजणगाव) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, सुनील हा पत्नी कोमल मुलगा शौर्य व श्रीवास्तव यांच्यासह रांजणगाव येथे राहत असून. तो वाळूज येथील एका कंपनीत काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीच्या चारित्रावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करायचा. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याची आई मनकरणा या सुनीलकडे राहण्यास आल्या होत्या.
मंगळवारी रात्री दारू पिऊन सुनीलने आई, पत्नी तसेच शेजारी राहणाऱ्या बहिणीसोबत वाद घातला. यामुळे कोमल व मनकरणाबाई या सुनीलच्या बहिनीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुनीलची आई मनकरणाबाई या घरी आल्या असता त्यांना सुनील हा घरात झोक्याला बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेत-लेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत सुनील यास बेशुद्धावस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त भागिरथी पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.