

Pipes worth four and a half crore rupees stolen even before the inauguration.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. परंतु हे काम करताना भीमनगर-भावसिंगपुरा भागात दलितवस्ती सुधार योजनेतून २ हजार घरांसाठी टाकलेली ४.५० कोटी रुपये खर्चाची लोखंडी जलवाहिनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीच्या सब कंत्राटदारांनी परस्पर काढून विक्री केल्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले होते. त्यावर प्रशासक जी. श्रीकांत यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.
शहरातील दलित वस्तींना दरवर्षी शासनाकडून दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी वितरित केला जातो. त्यांतर्गत ३ वर्षांपूर्वी भीमनगर-भावसिंगपुरा या वसाहतीसाठी ९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून सात वसाहतींत दोन हजार घरांना पाणी देण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्चाची लोखंडी पाईपलाईन टाकली होती. मात्र ही जलवाहिनी कार्यान्वितच करण्यात आली नाही. त्यादरम्यान शहरासाठी मंजूर झालेल्या २,७४० कोटी रुपये किमतीच्या योजनेचे काम सुरू झाले. त्यात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आल्या. भीमनगर-भावसिंगपुरा भागात अंतर्गत जलवाहिन्या टाकताना ही नवीकोरी लोखंडी जलवाहिनीही काढण्यात आली.
दरम्यान, या जलावाहिनीच्या जागी कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने प्लास्टिकचे पाईप टाकले. हे पाईप टाकताना जुनी काढलेली लोखंडी जलवाहिनी महापालिकेकडे जमा न करता कुठे ठेवली की विक्री केली, याबाबत प्रशासनालाही माहिती नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर जलवाहिन्या चोरल्याप्रमाणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सतीश शेगावकर यांनी मनपा प्रशासक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची गांभीयनि दखल घेत प्रशासक जी. श्रीकांत यांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.