

वैजापूर : देखभाल-दुरुस्तीवर पाच लाख रुपये खर्च झाले, मात्र दहा महिन्यांतच पंचायत समितीच्या घरकुल विभागाची दुरवस्था झाली. फरश्या उकरून उंदरांनी कार्यालयात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. सरकारी कार्यालयातील या विदारक स्थितीने दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आणला. पंचायत समिती सदस्य राहुल लांडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
गुरुवारी आयोजित मासिक सभेपूर्वी लांडे हे नागरिकांच्या कामानिमित्त कार्यालयाची पाहणी करत होते. त्यावेळी घरकुल विभागातील फरश्या उकरलेल्या आणि उंदरांचा मुक्त संचार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दहा महिन्यांपूर्वी पाच लाख रुपये खर्चुन दुरुस्ती करण्यात आली असेल, तर इतक्या कमी कालावधीत ही अवस्था कशी झाली, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
घरकुल विभागात गरजू नागरिकांच्या योजनांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि शासकीय संचिका असतात. अशा संवेदनशील विभागात उंदरांचा सुळसुळाट असणे म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा नमुना असल्याचा आरोप लांडे यांनी केला. दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होतो, तरीही कामाचा दर्जा तपासला जात नाही का ? अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोजच्या वावरात हा प्रकार दिसत नाही; मात्र लोकप्रतिनिधींना तो सहज नजरेस पडतो, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.