Khadakwadi Navratri Festival: खडकवाडीच्या भैरवनाथ महाराज मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

रविवारी घटस्थापना; दहा दिवस धुपारती, ओलांडा, भजन आणि शिव-पार्वतीच्या सोंगट्यांच्या खेळाचे आयोजन
Khadakwadi Navratri Festival
Khadakwadi Navratri FestivalPudhari
Published on: 
Updated on: 

लोणी-धामणी: कुलदैवत, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज देवस्थान, खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, मानकरी, गुरव, सालकरी आणि दागिनदार यांनी केले आहे.

रविवारी (दि. ११) सकाळी घटस्थापना होणार असून, १० दिवस सायंकाळी धुपारती, ओलांडा, त्यानंतर भजन आणि पुराणात वर्णन असलेल्या शिव-पार्वतीच्या सोंगट्यांच्या खेळाचे आयोजन केले जाते.

Khadakwadi Navratri Festival
Sonori Devi Temple: सोनोरीच्या तुळजाभवानी माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

सारिपाटाचा हा खेळ शेकडो वर्षांपासून येथे खेळला जात असून, त्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. पटावरील डाव, हार-जित आणि डावातील रंगत, यामुळे हा खेळ पाहण्यासाठीही मोठी गर्दी होते.

डाव रंगला, तर खेळ रात्रभर सुरू राहतो आणि पहाट कधी होते, याचे भान खेळणाऱ्यांना राहत नाही. खडकवाडी, लोणी, रानमळा, वाळुंजनगर आणि पंचक्रोशीतील खेळाची आवड असलेली मंडळी सहभागी होतात.

खेळ पाहण्यासाठी खडकवाडी, लोणी, धामणी, रानमळा, वाळुंजनगर, पोंदेवाडी, वडगावपीर, मांदळेवाडी, पारगाव, जरकारवाडी, पहाडदरा आणि शिरदाळे येथील ग्रामस्थ तसेच मान्यवर उपस्थित राहतात.

भाविक-भक्तांकडून भजन आणि सोंगट्यांचा खेळ खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी आलेल्यांसाठी चहा-नाष्ट्याची व्यवस्था केली जाते. यंदा अष्टमीला होमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Khadakwadi Navratri Festival
Illegal Gas Refilling Pune: मुंढव्यात घरगुती गॅसचे बेकायदा रिफिलिंग; तिघांवर गुन्हा दाखल

घटाच्या पहिल्या माळेला उत्सवमूर्ती गावठाणातील पालखी मंदिरातून मुख्य मंदिरात आणल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी सकाळी मानकरी मुलखी पाटील यांच्या हस्ते देवाच्या आत्मलिंगाचा अभिषेक होतो. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाथसाहेबांची पालखी निघते. जुन्या जाणत्या मंडळींच्या माहितीनुसार, यात्रेला आणि दसऱ्याला कारभारी कोबल मंडळी (कन्हेवाडी, ता. खेड) पालखीला खांदा लावत असत.

सोन्याची (आपट्याची), शमी (सौंदड) आणि बाजरीची पेंढी पालखीत ठेवून ती देऊळवाड्यात आणली जाते. ओवरीमध्ये पालखी ठेवल्यानंतर पूर्व आणि दक्षिण द्वारावरील दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात.

त्यानंतर उत्सवमूर्ती सजवून पालखीत ठेवल्या जातात. पूर्व द्वारातून पालखी दक्षिण द्वारासमोरील वडाच्या वृक्षाखाली नेली जाते. मानकरी मुलखी पाटील शिंदे सरकार यांच्या हस्ते शमीपूजन व सीमोल्लंघन केले जाते. त्यानंतर पालखी देऊळवाड्याच्या ओवरीत आणून महाआरती केली जाते आणि मानाचे विडे क्रमशः वाटले जातात.

यानंतर पालखी गावठाणाकडे नगरप्रदक्षिणेसाठी निघते. कारभारी धुमाळ बंधू कानिफनाथांची मानाची सासनकाठी घेऊन येतात. काठीची आणि कळसाची भेट झाल्यानंतर दसरा सोहळ्याचा एक भाग पूर्ण होतो. रात्री पुन्हा सोंगट्यांचा डाव व भजन सुरू राहते. कोजागरी पौर्णिमेचा सोहळाही गावठाणातील मंदिरात याच परंपरेनुसार पार पडतो आणि नवरात्रोत्सवाची सांगता होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news