

वैजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (८) कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडत बाजार समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
कांद्याचे दर घसरल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कष्ट आमचे आणि फायदा व्यापाऱ्यांचा अशी संतप्त प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचाही आरोप केला.
दरम्यान, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या संचालकांच्या नावाचे फलक जाळून निषेध नोंदवला. तसेच संचालकांचे प्रतीकात्मक दहन करत प्रशासनाविरोधातील रोष व्यक्त करण्यात आला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे कांदा मार्केटमधील व्यवहार काही काळ पूर्णपणे ठप्प झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बाजार समिती प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र, जोपर्यंत कांद्याला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाल दिला आहे.
संचालकांचा पुतळा दहन
कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीत लिलाब बंद करत आपला संताप व्यक्त करत आंदोलन केले. तब्बल दोन ते तीन तास उलटूनही एकही संचालक शेतकऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी मार्केटमध्ये न आल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संचालकांचाप्रतिकात्मक पुतळा दहन केला.