

वसमत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, दरातील प्रचंड तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारभावापेक्षा तब्बल साडेतीन हजार रुपयांनी कमी दराने हळदीचे लिलाव होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटना आक्रमक झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास बाजार समितीला थेट टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
या प्रकरणी बाजार समितीचे सभापती व सचिव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात शेतकरी व व्यापारी यांची तातडीने संयुक्त बैठक बोलावावी, दराचा प्रश्न सुटेपर्यंत हळदीचे लिलाव तात्पुरते बंद ठेवावेत, तोडगा न निघाल्यास बाजार समितीला टाळेठोक आंदोलन व बंद पुकारला जाईल असा इशारा देण्यात आला.
वसमत बाजार समितीत १६ एप्रिल रोजी हळदीचे लिलाव केवळ १२ हजार ते १३ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने काढण्यात आले. मात्र, त्याच दिवशी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज वरील हळदीचा स्पॉट रेट सुमारे १६ हजार ५०० रुपये होता. एवढी मोठी तफावत का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, व्यापाऱ्यांकडून संगनमताने दर पाडले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नियमानुसार बाजारभाव एनसीडीईएक्सच्या दराच्या आसपास अपेक्षित असताना, स्थानिक स्तरावर कमी दराने लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीतही न्याय मिळत नसल्याची भावना तीव्र झाली आहे.