

Useful water storage in Jayakwadi is around 50 percent
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाशिक आणि परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. धरणातील उपयुक्त साठा २९ टक्क्यांहून वाढून तो तब्बल ४९ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या जायकवाडी धरणात १५ हजार ३८९ क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे.
यंदा मराठवाड्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला. जून महिन्यात मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. परिणामी, पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून उर्ध्व गोदावरी खोर्यात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतो आहे. त्यामुळे गोदावरी पात्रात पाण्याची आवक होऊन हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. त्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जूनपासून ५ जुलैपर्यंत जायकवाडी धरणात तब्बल २० टक्के पाणी दाखल झाले आहे. शनिवारी सायंकाळी धरणातील उपयुक्त साठा ४९ टक्क्यांवर पोहचला. नागमठाण येथून जायकवाडी धरणाच्या दिशेने अजूनही १५ हजार ३८९ क्युसेक वेगाने पाणी येत आहे.
त्यामुळे पुढील चोवीस तासांत या साठ्यात आणखी वाढ होऊन हा साठा ५० टक्के होईल. उर्ध्व गोदावरी खोर्यातील दारणा, गंगापूर, कडवा, नांदूर मधमेश्वर बंधारा, देवगड आणि नागमठाणा या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणाच्या उपयुक्त साठ्याची एकूण क्षमता ही २१७० दलघमी इतकी आहे. सध्या धरणात एकूण १०५९ दलघमी उपयुक्त साठा आहे.