

प्रभाकर जाधव
गारज : मागेल त्याला सौरऊर्जा या शासनाच्या योजनेसाठी गारज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंधरा ते वीस गावांतील असंख्य शेतकऱ्यांनी सौरऊर्जा पॅनलसह साहित्यासाठी प्रत्येकी ३३ हजार रुपये संबंधित विभागाकडे जमा केले आहेत. दहा महिने झाले तरी अद्यापही शेतकऱ्यांना याचा लाभमिळत नसल्याने शेतकऱ्यात संतापाची लाट आहे.
विजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यास अनेकवेळा अडचणी येतात. शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी यासाठी शासनाने सौरऊर्जा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. मात्र, संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना या चांगल्या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.
गारज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सौरऊर्जेसाठी अर्ज करून प्रत्येकी ३३ हजार रुपयांचा भरणा गारज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनुर, भोकरगाव, झोलेगाव बायगाव, जांबरखेडा, मालेगाव लाखनी मांडकी, भायगाव, पाथरी बाभुळगाव, शिवगाव, मनेगाव 7 साकेगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे. याला दहा महिने झाले आहे. तरी अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. यामुळे शेतकर्यांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये संबंधित विभागाकडे जमा झालेले आहेत, मात्र अनेक वेळा कंपनी निवडताना खूपच समस्या निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
एकीकडे मागेल त्याला सौरऊर्जा पण मिळत नाही तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनी परिसरात वीज पुरवठा वेळेवर देत नसल्याने शेतकऱ्यांची तक्रार आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडून पार शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तेव्हा संबंधितांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी परिसरात शेतकऱ्यांकडून होत आहे.