

Under the pretext of offering help, an elderly man's ATM card was swapped, and ₹30,000 was siphoned off
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना मदतीचा बहाणा करत एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. एटीएम मशिनमध्ये ५०० च्या नोटा नाहीत, मी तुम्हाला पैसे काढून देतो, अशी बतावणी करत एका वृद्धाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यांच्या बँक खात्यातून भामट्याने ३० हजाराची रोकड लंपास केली. हा प्रकार सहकारनगर चौकातील एसबीआयच्या एटीएम केंद्रात मंगळवारी (दि. ३) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडला.
फिर्यादी गोविंदराव यादवराव भारसाखळे (७४, रा. म्हाडा, रामकृपा कॉलनी, प्रतापनगर समोर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी ११:४५ ते १२:०० वाजेच्या सुमारास घरखर्चासाठी पैसे काढण्यासाठी गारखेडा परिसरातील सहकारनगर येथील एसबीआयच्या एटीएम केंद्रात गेले. पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक इसम त्यांच्याजवळ आला. तुम्हाला जमत नसेल तर मी पैसे काढून देतो, असे म्हणत त्याने मदतीचा आव आणला. भारसाखळे यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून हातातील एटीएम कार्ड त्याच्याकडे दिले. त्या भामट्याने ते कार्ड मशिनमध्ये टाकले आणि पिन टाकण्यास सांगून स्क्रीनकडे पाहिले.
पिन क्रमांक टाकल्यानंतर भामट्याने क्षणात हातचलाखी केली. "या मशिनमध्ये ५०० रुपयांच्या नोटा संपल्या आहेत, फक्त १०० च्या नोटा शिल्लक आहेत, अशी थाप मारून त्याने मशिनमधून कार्ड बाहेर काढले. नजर चुकवून त्याने स्वतःजवळील दुसरेच एक निरुपयोगी एटीएम कार्ड भारसाखळे यांच्या हातात टेकवले आणि त्यांचे मूळ एटीएम कार्ड घेऊन पळ काढला.
बँकेत जाताच बसला धक्का
संशय आल्याने भारसाखळे हे तात्काळ बाजूलाच असलेल्या बँकेच्या शाखेत गेले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना हातातील कार्ड दाखवून, माझ्या कार्डमधून पैसे का निघत नाहीत ? अशी विचारणा केली. त्यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी कार्ड तपासताच, हे कार्ड तुमचे नसून दुसऱ्याच कोणाचे तरी आहे, असे सांगितले. त्यांनी बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, त्यांच्या खात्यातून अवघ्या काही मिनिटांत १० हजाराचे सलग तीन व्यवहार होऊन ३० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. भामट्याने संपूर्ण खाते रिकामे केले असून खात्यावर केवळ १०० रुपये शिल्लक राहिले होते. त्यांनी जवाहरनगर ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास हवालदार अनिता उपाध्ये करत आहेत.