

Six thousand rupees will have to be paid for a water connection
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून घरापर्यंत नळाचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना आठ हजार २५ रुपये मोजावे लागणार आहेत. अर्ध्या इंचाच्या नळजोडणीसाठी सहा हजार रुपये शुल्क आणि वर्षभराची दोन हजार २५ रुपये पाणीपट्टी एकाच वेळी भरावी लागणार आहे. सातारा-देवळाईसह शहरातील १४ नो नेटवर्क झोनमध्ये ही आकारणी लागू करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (दि. ४) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. शुल्क निम्मे करण्याची नगरसेवकांची मागणी प्रशासनाने फेटाळली.
महापालिका प्रशासनाने नवीन जलवाहिन्यांवरून नळजोडण्या देण्यासाठी शुल्क निश्चित करण्यासह आवश्यक साहितय खरेदीचा प्रस्ताव ऐनवेळी सभेपुढे मांडला. त्यावर झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी सहा हजार रुपयांचे शुल्क तीन हजार रुपये करण्याची मागणी सविता कुलकर्णी, दया गायकवाड, रामदास हरणे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे आणि सावित्री वाणी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली.
आयुक्त अमोल येडगे यांनी शुल्काचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, प्लंबरचे १,८०० रुपये, तर अर्ज शुल्क, तपासणी शुल्क, रस्ता दुरुस्ती आणि जोडणी साहित्य यांसाठी चार हजार २०० रुपये, असे एकूण सहा हजार रुपये आकारले जातील. सातारा-देवळाईसह १४ नो नेटवर्क झोनमधील नागरिकांना अर्ध्या इंचाची जोडणी या दराने मिळेल.
दर कमी करण्याचा उपमहापौरांचा आग्रह
रस्ता खोदण्याची आवश्यकता नसलेल्या ठिकाणी नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीचे शुल्क आकारू नये, अशी मागणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली. गुंठेवारीत शुल्क कमी केल्याप्रमाणे नळजोडणीचे दरही कमी करावेत, असे ते म्हणाले. शहरातील अनधिकृत जोडण्या आणि मध्यस्थांकडून ३०० रुपये घेऊन अर्ज भरून घेण्याचा प्रकारही त्यांनी निदर्शनास आणला.