

Two men arrested for snatching a mobile phone and a bali
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा कचरा फेकण्यासाठी जाणाऱ्या तरुणास दमदाटी करून सोन्याची बाळी व मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी काही तासांत जेरबंद केले. गजानन फकिरा जाधव (२५) व सचिन भुजंगराव मिसाळ (३४, दोघे रा. पवननगर, रांजणगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, एकनाथ चौधरी (३२, रा. सप्तश्रृंगी मातामंदिर, बजाजनगर) हे ३१ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास स्टरलाईट कंपनीसमोर असलेल्या कचरा कुंडीत कचरा टाकण्यासाठी गेले होते. यावेळी दोन भामट्यांनी चौधरी यांना दमदाटी करून मारहाण करत त्यांच्या कानातील ९ हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. घटनेनतंर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व त्यांनी काही सराईत आरोपींचे फोटो दाखवताच चौधरी यांनी त्यातील दोन आरोपींना ओळखले होते.
पहाटे घरी येताच आवळल्या मुसक्या
लुटमार करणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी पत्ता शोधून रात्री उशिरा सापळा रचला होता. दरम्यान, थर्टी फर्स्ट साजरा र्नरू आरोपी गजानन जाधव व सचिन मिसाळ हे गुरुवारी पहाटे घरी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, जमादार सय्यद चांद, कच्चे, पोलिस अंमलदार नितीन इनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, सुरेश भिसे व त्यांच्या पथकाने केली.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी गजानन जाधव व सचिन मिसाळला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनस ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याने तपासात यांच्याकडून इतर गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.