

Police Commissioner's masterstroke; Economic Intelligence Unit activated
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वसामान्यांची कोटचवधी रुपयांची लूट करणाऱ्या बोगस संस्था, कंपन्यांचे पेव फुटले आहे. या फसवणुकीच्या साखळीला सुरुंग लावण्यासाठी पोलिस आयुक्त पवार यांनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहर स्तरावर विशेष आर्थिक गुप्त वार्ता पथक कार्यान्वित केले आहे. गुन्हे घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा, फसवणुकीचा कट रचला जात असतानाच तो उधळून लावणे, हे पथकाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी आयुष्यभराची जमापुंजी ठेवलेल्या ठेवीदारांचे कंबरडे मोडले आहे. यात आदर्श पतसंस्था, राजस्थानी मल्टीस्टेट, अजिंठा अर्बन, ज्ञानोबा पतसंस्था, यशस्वीनी, देवाई, आभा, अशा अनेक प्रकरणांमध्ये ठेवीदारांची कोट्यवधींची लूट झाली. ठेवीदारांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. अनेक संस्था मोठमोठी आश्वासने, ठेवींवर आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवतात.
मात्र, काही वर्षांनी संस्था दिवाळखोरीत निघाल्याचे समोर येत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच मल्टी-लेव्हल मार्केटिंग आणि पॉन्झी स्कीम्सनीही अनेकांना देशोधडीला लावले आहे. कमी काळात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीच्या, शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक बोगस कंपन्यांनी सुशिक्षित वर्गाला लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शहराच्या विस्तारणाऱ्या भागात स्वस्त दरात प्लॉट देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. काही अवैध भिशी चालक आर्थिक फसवणूक करत असल्याचेही समोर आले. त्यामुळे अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी, हे विशेष पथक पोलिस आयुक्त यांनी स्थापन केले आहे.
हे पथक पोलिस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांच्या देखरेखीखाली आणि सहायक आयुक्त अशोक राजपूत व आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. फिल्डवर माहिती संकलनाचे काम उपनिरीक्षक सचिन देशमुख आणि दोन अंमलदार करणार आहेत.
पथकाचे कामकाज
१) गोपनीय माहिती संकलन : बोगस कंपन्या, संशयास्पद बँका, वित्तीय संस्था आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग एजन्सी यांच्या बाबत हे पथक गोपनीय माहिती काढेल.
२) अक्षम्य सतर्कता : अपराध घडण्यापूर्वीच संशयास्पद आस्थापनांच्या हालचाली टिपून प्रतिबंधात्मक कारवाई करणे, हे या पथकाचे उद्दिष्ट आहे.
३) जनजागृतीवर भर : नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन, विविध ठिकाणी भेटी देऊन चर्चासत्रे आणि व्याख्याने आयोजित केली जातील, जेणेकरून कोणीही या आर्थिक जाळ्यात अडकणार नाही