

Argument Between College Girls turns violent one injured Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोबत राहत नाही, बोलत नाही यापासून सुरू झालेला वाद वाढत गेला आणि त्यावादातून चार मैत्रिणींमध्ये जोरदार राडा झाला. एका गटात तिघी तर दुसऱ्या गटात एकच तरुणी होती. रागाच्या भरात एकमेकींवर थेट कटरने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि.२२) रात्री आठच्या सुमारास उस्मानपुरा भागातील रमानगरात घडली.
पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका (२३, नाव काल्पनिक) ही बीबीएच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत असून, २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी पुण्याला गेली होती. तिथे तिची मीना (नाव काल्पनिक) हिच्याशी ओळख झाली. दोघी त्यावेळेपासून संपर्कात आहेत. सहा महिन्यांपूर्वी सारिका परत संभाजीनगरात आली आणि काही दिवसांनी मीनाही येथे आली. एप्रिलच्या अखेरीपासून ८ जुलैपर्यंत मीना सारिकाच्या घरीच राहत होती.
मात्र मीनाचे रात्री उशिरा बाहेर जाणे, फिरणे याकडे सारिकाच्या आईचे लक्ष गेले. त्यामुळे तिने मीनाला घर सोडण्यास सांगितले आणि दहा दिवसांपूर्वी तिला घराबाहेर काढले. या काळात मीना श्रेया आणि राणी सोबत राहू लागली. त्यानंतर मीना आणि सारिकामध्ये वाद वाढू लागला.
मीना वेगवेगळ्या नंबरवरून सारिकाला फोन करून धमक्या व शिवीगाळ करत होती. अखेर मंगळवारी मीना, श्रेया आणि राणी मिळून सारिकाच्या घराजवळ आल्या व अपार्टमेंटच्या खाली उभे राहून गोंधळ घालू लागल्या. सारिकाची आई खाली आली. त्या वेळी तिघींनी आईला आणि सारिकालाही मारहाण केली. मीनाने सारिकाच्या हातावर कटरने वार करून जखमी केले. सध्या सारिकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राणी (३०) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती बी. कॉम. च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मीना आणि श्रेया या तिच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. ८ जुलै रोजी मीनाच्या वाढदिवसादिवशी सारिका आणि मीनामध्ये भांडण झाले होते. त्या दिवसानंतर तिघीही सारिका सोबत बोलत नव्हत्या.
सोमवारी (दि. २१) रात्री एक वाजता सारिकाने राणीला फोन करून तुम्ही तिघी माझ्याशी का बोलत नाहीत, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यामुळे मंगळवारी दुपारी राणीने तिला कॉल करून शिवीगाळ केल्याचा जाब विचारताच पुन्हा तीन शिवीगाळ केली. याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी रात्री आठच्या सुमारास तिघीही सारिकाच्या घरी गेल्या. तेथे झालेल्या वादात, सारिकाच्या आईने त्यांना मारहाण केली. सारिकाने कटरने तिघींवर हल्ला करून हातावर, पाठीवर छातीवर, मानेवर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.