

Municipal Corporation now provides digital services for property tax and water charges
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासह थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, पथदिवे बंद यासह कचरा गाडीची वेळ, अवैध होर्डिंग्स यांसारख्या तक्रारी नोंदवण्यासाठी आता डिजिटल सेवा सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महापालिका व स्मार्ट सिटीच्यावतीने स्मार्ट व्हॉट्सअॅप चॅटबॉट, भारत बिल पेमेंट सिस्टम, सक्षम मोबाईल या तीन सेवा सुरू करण्यात आल्या असून, मंगळवारी (दि.२२) मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला.
नागरिकांना अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि तंत्रस्नेही नागरी प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी स्मार्ट व्हॉट्सअॅप चॅटबॉट ही सेवा +९१ ९४८५२०२०२० या क्रमांकावर सुरू करण्यात आली आहे, यामुळे कोणताही अॅप डाऊनलोड न करता नागरिकांना व्हॉट्सअॅपवरून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरणे, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड करणे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अपडेट करणे, आरसीएस अजमावणे, बंद लाईट, कचरा गाडीची वेळ, अवैध होर्डिंग्स यांसारख्या तक्रारी नोंदवणे सहज शक्य होणार आहे.
मराठी आणि इंग्रजी भाषेत ही सेवा उपलब्ध असून पेमेंट गेटवे एकत्रित केल्यामुळे नागरिकांना सुविधा केंद्रात जाण्याची गरज नाही. तसेच भारत बिल पेमेंट सिस्टीममुळे नागरिक आता कोणत्याही यूपीआय अॅप वॉलेट, नेट बँकिंग प्लॅटफॉर्म द्वारे महापालिकेचे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरू शकतात. यासाठी मालमत्ता क्रमांक किंवा पाणीपट्टी क्रमांक टाकून थकबाकी तपासून भरता येणार असून, ही सेवा सर्व अॅप्सवर उपलब्ध आहे. तर सक्षम मोबाईल अॅप हे विशेषतः दिव्यांग नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आले असून, त्यांना शिष्यवृत्ती, उपजीविकेचे सहाय्य, आर्थिक सवलत भत्ते यांसाठी नोंदणी व खात्रीप्रक्रिया पार पाडता येणार आहे.
युडीआयडी कार्ड प्रमाणीकरण, लाईव्ह सेल्फी सबमिशन (जीवन प्रमाणपत्रासाठी) करता येणार असून हे अँप ओटीपी आधारित प्रवेश प्रणाली सुरक्षित, पारदर्शक आणि गैरवापर प्रतिबंधक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप उपलब्ध आहे.