

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात घरफोडी करत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पाच मोठे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मंगेश भुऱ्या भोसले (५०) आणि दिनेश सखाराम काळे (४५, दोघेही, रा. रहाटगाव, ता. पैठण) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सोमवारी (दि.५) दिली. फुलंब्री येथील हरिओम नगरमधील फिर्यादी मज्जीब मन्नान शेख यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांत २६ नोव्हेंबरला घरफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत आणि त्यांचे पथक करत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना गुन्ह्यातील संशयित आरोपी गेवराई येथील अलाना कंपनी परिसरात लपलेले असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने गेवराई येथे जाऊन सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. मंगेश भोसले आणि दिनेश काळे दोघांची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच फुलंब्रीसह जिल्ह्यातील इतर चार ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. फुलंब्री, शिवूर, गंगापूर आणि पैठण ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून चोरीच्या हिश्याला आलेले २५ हजार रोख आणि ३५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, अंमलदार कासीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलविरसिंग बहुरे, योगेश तरमळे, जिवन घोलप आणि शिवाजी मगर यांनी केली.