

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील शेंदुरवादा येथील हॉटेल आकाशमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, हॉटेल मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवारी (दि.५) दिली.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना हॉटेल आकाशमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका बंद खोलीत छापा टाकला असता तिथे १२ जण तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. चौकशीत हॉटेल मालक संतोष विष्णू दुबिले (रा. शेंदुरवादा) हाच स्वतःच्या हॉटेलमध्ये जुगारासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी ५३ हजार ९० रुपये रोख आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, डीसीपी रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक गजानन कल्याणकर, पीएसआय अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंके, मनोहर गीते, अभिषेक बाठे, प्रतीक साबळे, रोहित जाधव, सागर शेंडे आदींच्या पथकाने केली.
हे जुगारी ताब्यात
संतोष दुबिले, किरण गुंजाळ, श्रीराम चव्हाण, भरत काळुंके, दौलत रंधवे, संजय दुबिले, किशोर भवर, रामचंद्र भवर, राजेंद्र ईनामे, शिरीष लघाणे, श्रावण शिंदे आणि मुन्सी शहा अशी ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे आहेत. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात जुगारबाबत तक्रारी वाढल्या असून याप्रकरणी पोलिांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.