

Tube removed from married woman body, loss of motherhood
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सासरच्यांनी परस्परपणे शरी रातील एक ट्यूब काढून टाकल्यामुळे एका विवाहितेचे मातृत्व हिरावल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
गीता (नाव बदललेले - वय ३४) या शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ एप्रिल २०१७ रोजी तिचा विवाह इंजिनिअर संदीप बोराडेशी झाला होता. सुरुवातीचे वर्ष सुखद गेले. मात्र त्यानंतर सासरा देवराव, सासू शशिकला आणि नंदोई विनोद यांनी शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
२०१९ मध्ये सविताला गर्भधारणा झाल्यानंतरही तिच्यावर जास्त कामे लादली गेली. परिणामी, प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच वेळी तिच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही कल्पना न देता तिच्या शरीरातील एक ट्यूब काढून टाकण्यात आली.
काही काळानंतर तपासणीतून ही गोष्ट उघड झाली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की, ती कधीही आई बनू शकणार नाही. याशिवाय, सासरी तिच्यावर खाण्या-पिण्याचे बंधन, शेजाऱ्यांशी बोलण्यास मनाई, वॉशिंग मशीन असूनही कपडे हाताने धुण्याची सक्ती केली जात होती. घराच्या बांधकामासाठी पाच लाख रुपये माहेराहून आणण्याचा तगादा लावत मारहाणही करण्यात आली.
२०२४ पासून विवाहितेला घरातून हाकलून दिले आणि ती माहेरी राहू लागली. या प्रकरणी पती संदीप बोराडे, सासरा देवराव, सासू शशिकला व नंदोई विनोद साळवे यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.