

Sillod Manoj Jarange Maratha Reservation
सिल्लोड, केन्हाळा, पुढारी वृत्तसेवा
आपली मुलेच आपली संपत्ती आहेत. त्यांच्या भवितव्याचा विचार करा. पक्षांच्या नेत्यांची हुजरेगिरी करणे सोडून मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या. तुम्हाला तुमची मुलेच कामाला येतील, असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी केले.
मंगळवारी (दि. १५) रात्री त्यांनी तालुक्यातील धानोरा गावाला अचानक भेट दिली. यावेळी समाजाच्या चावडी बैठकीत जरांगे बोलत होते. २९ ऑगस्टला आरक्षण मागणीचा भाग म्हणून सर्वांनी मुंबईला हजर राहावे. यासाठी मराठा सेवक प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने त्यांनी ही अचानक भेट देत समाज बांधवांशी संवाद साधला.
मराठा समाजाने निर्व्यसनी जीवन जगले पाहिजे. बांधावरून भांडणे करू नका. आधुनिक शेतीसह उद्योग, धंद्यांची कास धरा. तर अनेक उपोषण, आंदोलनांमुळे मी आता थकलो असून, ऊर्जा राहिलेली नाही. यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आरक्षण चळवळीच्या डोलीचा भार खांद्यावर घ्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठा आरक्षणाच्या चळवळीत कायमस्वरूपी सक्रिय राधाकृष्ण काकडे यांच्या गावाला राहणारे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी ही अचानक भेट दिली, ही माहिती मिळताच तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव आले होते. यात महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती.
दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर शाईफेक हल्ला करण्यात आला. असे कृत्य समाजात दुफळी निर्माण करणारे आहे. समाजाने एकमेकांवर असे हल्ले करू नये. मराठा आर-क्षणासाठी समाजाची एकजुटता महत्त्वाची असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. तर यावेळी त्यांचा पळशी, केन्हाळा या गावांमध्ये सत्कार करण्यात आला. एक मराठा लाख मराठा, या घोषणांनी तरुणांनी परिसर दणाणून सोडला होता.