

Trip before mayor-deputy mayor election canceled this year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापौर उपमहापौरच्या निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नये, यासाठी भाजप-शिवसेना आपापल्या नगरसेवकांना एकाच ठिकाणी सहलीवर पाठवत होते. या सहलीमुळे नगरसेवकांनाही फिरण्याची संधी मिळत होती.
परंतु, यंदा भाजप स्पष्ट बहुमताजवळ पोहचली असून त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ५८ च्या मॅजिक फिगरपैकी ५७ नगरसेवक आहेत. त्यामुळे यंदा निवडीपूर्वीची नगरसेवकांची सहल जाणार नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने वेगवेगळी लढविली. यात भाजप घवघवीत यश मिळवित स्पष्ट बहुमताजवळ गेले. त्यांचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले. तर शिवसेनेला केवळ १३ नगरसेवक निवडून आणण्यातच यश आले. मात्र, असे असतानाही भाजपने युतीधर्माचे पालन करीत शिवसेनेला सत्तेत समावून घेतले.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झालेल्या महापालिकेवर भाजपचा पहिला महापौर विराजमान होत आहे. शिवाय महापालिकेवर पुन्हा एकादा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता कायम आहे. आतापर्यंत शिवसेना-भाजप यांना बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी काही अपक्षांची साथ घ्यावी लागत होती. परंतु, यंदा ११५ पैकी भाजपचे ५७ आणि शिवसेनेचे १३ असे एकूण ७० नगरसेवक हे युतीचेच निवडून आले आहेत. त्यामुळे मॅजीक फिगरपेक्षाही १२ अतिरिक्त नगरसेवक संख्या युतीकडे आहे. त्यामुळे यंदा सहल जाणार नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.