

Little girls who suffered serious eye injuries while playing receive new sight
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
: खेळताना डोळ्याला गंभीर इजा झालेल्या पाच वर्ष वयोगटातील दोन चिमुकलींची दृष्टी वाचवण्यात घाटी नेत्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांना यश आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे यांनी सांगितले.
पहिल्या घटनेत एक चिमुकली चिंचेच्या झाडाखाली खेळत असताना चिंच पडून त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात आणले असता तपासणीदरम्यान या मुलीच्या डोळ्यांत काडी अडकलेली असल्याचे निर्देशनास आले. आपत्कालीन शस्त्रक्रियेद्वारे ती काडी अत्यंता काळजीपूर्वक काढण्यात आली.
दुसऱ्या घटनेतील लहान मुलगी घरासमोर खेळत असताना जमिनीवर पडलेली लोखंडी तार धक्का लागून थेट डोळ्यात घुसली. त्यामुळे या चिमुकलीच्या बुबुळाला गंभीर जखम झाली. त्यामुळे तीलाही घाटी रुग्णालयातील नेत्र विभागात दाखल करण्यात आले. तीच्या डोळ्यावरही तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली.
या दोन्ही रुग्णावर अधिष्ठाला डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रविभागप्रमुख डॉ. अर्चना वरे, डॉ. तपन जक्कल, डॉ. वेणुकुमार रंगू यांच्या सहकायनि कार्निया तज्ज्ञ डॉ. महेश सोनपेठकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूलतज्ञ टीममधील डॉ. गणेश निकम, डॉ. अमीर सय्यद, डॉ. नियती सेठी, डॉक्टर आकाश यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच स्टाफ नर्स कालंदी इधाटे, विकास गायकवाड, यमुना मुंडे, सोनाली गायकवाड, गीता गिते, रूपाली रासने यांनी शस्त्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. काळजी घ्या, अपघात टाळा... लहान मुले उत्साही व खोडकर असतात.
परंतु खेळताना सुरक्षित वातावरण असणेही महत्त्वाचे आहे. यासाठी टोकदार वस्तू, लाकडी काठ्या, लोखंडी तारा किंवा इतर धोकादायक साहित्य असलेल्या ठिकाणी मुलांनी खेळणे टाळावे. पालकांनी मुलांवर योग्य देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. अर्चना वरे यांनी केले.