

Businessman beaten up over land deal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जमिनीच्या व्यवहारात दोन लाख रुपये टोकन म्हणून दिलेली रक्कम आताच परत कर म्हणत दोघांनी उल्कानगरी येथील एका व्यापाऱ्याला घरात घुसून मारहाण केली. तसेच व्यापार्याच्या पत्नीसह मुलालाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्धमान रेसिडेन्सीत घडली. असलम खान रोशन खान पठाण आणि तैमुर गौस शेख (दोघे रा. लातूर) अशी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रमेश संचेती (५२, रा. वर्धमान रेसिडेन्सी, उल्कानगरी) यांनी लातूर येथील असलम खान रोशन खान पठाण आणि तैमुर गौस शेख यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी संचेती यांना या दोघांनी २ लाखांची टोकन रक्कम दिली होती.
ही रक्कम वसूल करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास असलम व तैमूर यांनी संचेती यांचे घर गाठले संचेत घरी नव्हते. तरीही त्यांनी घरात घुसत घरातील लोकांना शिविगाळ सुरू केली. याच दरम्यान संचेती घरी आले. त्यावेळी २ लाख रुपये आताच्या आताच दे म्हणून वाद घातला आणि संचेती यास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
जीवे मारण्याची धमकी
संचेती यांना मारहाण करत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी व मुलाने मध्यस्थी केली. यावेळी असलम आणि तैमूर यांनी त्या दोघांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे संचेती कुटुंबात दहशत पसरली होती. शेवटी संचेती यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठत त्या दोघांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून असलम व तैमूर विरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास हवालदार तडवी करीत आहेत.