

Transfers in the city police force
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या मुहूर्तावर शहर पोलिस दलात बदल्यांचा बार उडाला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी (दि.१७) अंतर्गत बदल्यांचे आदेश काढून १५ पोलिस निरीक्षकांची खांदेपालट केली. यामध्ये गुन्हे शाखेला पूर्णवेळ पोलिस निरीक्षक म्हणून गजानन कल्याणकर यांची वर्णी लागली आहे. वाळूज, हसूलच्या ठाणेदाराची उचलबांगडी करण्यात आली.
शहर पोलिस दलात गेल्या अनेक दिवसांपासून बदल्यांचे वारे वाहत होते. अनेकजण पसंतीचे ठाणे मिळावे यासाठी प्रयत्नात होते. जूनपासून गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे होता. त्यांची दोन्ही शाखा अतिशय प्रभावीपणे सांभाळल्या. बदल्यांमध्ये काहींना पसंतीचे ठाणे मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली, तर हसूल, वाळूजच्या ठाणेदाराची उचलबांगडी करण्यात आली.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर नशामुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या नार्कोटिक्स पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांची एमआयडीसी सिडको ठाण्यात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी कोण? पथकातील काही कर्मचाऱ्यांचीही इतरत्र बदली झाल्याने पथकाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, बदल्यांमध्ये विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे अतिरिक्त पदभार देऊन चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे छावणी पोलिस ठाणे, छावणी वाहतूक शाखा आणि शहर वाहतूक शाखा २ येथे इन्चार्ज असलेल्या एपीआयच्याही कालांतराने बदल्या होण्याची शक्यता सत्रांनी वर्तविली आहे.