

1500 express channel Hydraulic test successful
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर शहरात नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जाणार असून, यासाठी टाकण्यात आलेल्या १५०० मिमी व्यासाच्या एक-सप्रेस जलवाहिनीचे शुक्रवारी (दि.१७) हायड्रोलिक चाचणीची प्रक्रिया करण्यात आली. यात नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून शिव-ाजीनगरपर्यंत गुरुत्वाकर्षणाने पाणी दाखल झाल्याने चाचणी यशस्वी ठरली आहे.
शहरवासीयांना येत्या डिसेंबर महिन्यापासून नवीन पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्र ते शिवाजीनगरदरम्यान हायड्रोलिक चाचणी घेण्यात आली. यासाठी पाच एमएलडी (५० लाख लिटर) पाण्याचा वापर करण्यात आला. या चाचणीसाठी देण्यात आलेल्या प्रेशरमुळे पाण्याचा फवारा तीन मजलीपेक्षा जास्त उंच उडाला. ही चाचणी पहाण्यासाठी लोकांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गर्दी केली होती.
नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र नक्षत्रवाडीत आहे. या डोंगरात असलेल्या या जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुत्वआकर्षणाने पाणी शहरात आणल्या जाणार आहे. यातील एक पाईपलाईन ही देवळाईमार्गे शिवाजीनगर भागापर्यंत नेण्यात आली आहे. या एक्सप्रेस लाईनमधून शिवाजीनगर, सिडको हडको या भागातील जलकुंभ भरल्या जातील.
एक्सप्रेस वाहिनी केलेली हायड्रोलिक चाचणी ही दीड किलोमीटर पाईपच्या कामाची तपासणीसाठी केली. यात पाईप दोन्ही बाजू बंद करून त्यात एका छिद्रातून पाण्याचा पाईप टाकून त्यात पाण्याचा दाब दिला जातो. हा दाब एका विशिष्ट प्रमाणापर्यंत दिला जातो. त्यावर पाईपची जोडणी योग्यरीत्या झाल्याचे निश्चित होते. गळती होऊ नये यासाठी ही चाचणी गरजेची असते.