

Traffic jam at Seven Hills, Gajanan Mandir Chowk and High Court Signal
प्रमोद अडसुळे
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी सिग्नल यंत्रणा असते, पण शहरातील काही प्रमुख चौकांची आणि सिग्नलची रचनाच इतकी अजब आहे की, त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाहनांना आणि पादचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. चौकाची रचना अजब असल्याने सेव्हनहिल, गजानन मंदिर चौक आणि हायकोर्ट सिग्नलवर दररोज हजारो नागरिकांना याचा फटका बसत आहे.
हायकोर्ट सिग्नलः यू टर्नचा धोका
जालना रोडवरील अत्यंत वर्दळीच्या हायकोर्ट सिग्नलवर सेव्हनहिलकडून सिडकोकडे जाणारी वाहतूक न थांबता सतत सुरू ठेवली आहे. सिडकोकडून आलेल्या बाहनांना येथे यू टर्न घेताना समोरून न थांबता येणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत असून, अपघाताचाही धोका आहे. वाहनांचा वेग आणि सततची ये-जा यामुळे या चौकात पादचाऱ्यांना वाहनांच्या बरोबरीने जीव मुठीत धरूनच रस्ता पार करावा लागतो.
सर्व्हिस रोडची राँग साईड तन्हा !
हायकोर्टाच्या बाजूने सिडकोकडे जाणारा सर्व्हिस रोड पुढे सिडको चौकात गेल्यानंतर अचानक राँग साईड ठरतो. तर सिडकोकडून येणारी वाहने हायकोर्टजवळ पुढे रस्ता नसल्याने एन-३ रस्त्याने यू टर्न घेऊन जालना रोडला जावे लागते. रस्त्यांची आणि चौकांची ही अशी विचित्र रचना करून नगररचना विभागाने नेमके काय साध्य केले? असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत.
सेव्हनहिल सिग्नल चौकाला मारा वळसा !
सेव्हनहिल सिग्नलवर तर नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या चौकातील रचना वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. एमजीएम किंवा गजानन महाराज मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना या चौकातून थेट सरळ जाण्यासाठी मार्ग नाही. या वाहनांना चौकाला वळसा घालून मगच सिडको, एमजीएमकडे किंवा आकाशवाणीकडे जावे लागते. येथे केवळ जालना रोडवरील दोन्ही बाजूंची वाहने सरळ मागनि जातात. या वळसा मारण्याच्या प्रकारामुळे चौकात वाहनांची मोठी कोंडी होते आणि याच कोंडीतून पादचाऱ्यांना स्वतःचा जीव वाचवत रस्ता ओलांडावा लागतो.
गजानन महाराज मंदिर चौक
हा चौक मध्यभागी नसल्याने वाहनचालकांचा अनेकदा गोंधळ उडतो. सेव्हनहिल कडून सूतगिरणीकडे जाणारी येणारी वाहने, हेडगेवार हॉस्पिटलकडून येणारी-जाणारी वाहने, पुंडलिकनगरकडून येणारी-जाणाऱ्या वाहनांना सरळ मार्ग नाही. ज्या बाजूचे सिग्नल निघाले त्या वाहनासोबत नागरिकांना रस्ता ओलांडून जावे लागते