

Smart City welcomes tourists, entrepreneurs with potholed roads
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मोठ्या प्रयत्नानंतर डीएमआयसीच्या शेंद्रा ऑरिक आणि बिडकीनमध्ये मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. उद्योजकांना सुसज्ज रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेने धडक मोहीम राबवून रामनगर ते केब्रीज शाळाचौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने दीड हजाराहून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून दबलेला श्वास मोकळा केला, परंतु पाच महिने उलटूनही रस्त्याचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोडचे कामच काय तर साधे पॅचवर्कही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेने केली नाही. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, उद्य-ोजकांचे स्वागत स्मार्ट सिटी खड्यांनी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातून चिकलठाणा व शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीसह शेंद्रा डीएमआयसीकडे जाणाऱ्या जालना रोडची सध्या दुरवस्था झाली आहे. हा रस्ता शहराची लाईफलाईन समजला जातो. एवढेच नव्हे तर याच रस्त्यावर चिकलठाणा विमानतळ देखील आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या या प्रमुख रस्त्याचा दबलेला श्वास मोकळा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच धडक मोहीम राबविली. हा रस्ता विकास आराखड्यानुसार सेव्हनहिल ते केंब्रीज शाळा चौकापर्यंत दोन्ही बाजूने प्रत्येकी ६० मीटर रुंदीचा करण्यासाठी एपीआय कॉर्नर ते केंब्रीज शाळा चौकापर्यंत सुमारे दीड हजार मालमत्ता जमीनदोस्त केल्या.
या मोहिमेनंतर शहरातील बेकायदा बांधकामधारकांत मोठी दहशत निर्माण झाली होती. मोहिमेनंतर या रस्त्याचा कायापालट होईल, अशी प्रत्येकालाच आशा होती. एवढेच नव्हे तर महापालिका रस्त्यावरील दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोड चिकलठाण्यापर्यंत तयार करेल, अशी चर्चाही नागरिकांमध्ये होती. प्रत्यक्षात ना मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले, ना महापालिकेने या रस्त्यावर केंब्रीज शाळा चौकापासून ते एपीआयपर्यंत सर्व्हिस रोडचे काम केले. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या जालना रोडवर मुकुंदवाडी, धूत रुग्णालय, चिकलठाणा ते केंब्रीज शाळा चौकादरम्यान खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
कडेला जीवघेणी घसरण
रस्त्याचे काम बेजबाबदार पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचे साईडपंखे व्यवस्थित भरणा केलेले नसल्याने अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन किरकोळ अपघात घडत आहेत. तेव्हा प्रशासन मोठे अपघात होण्याची प्रतीक्षा करीत आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
मुख्य रस्ता सा.बां.वि.कडे
जालना रोड महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते क्रांती चौकादरम्यान महापालिकेकडे येतो. तर तेथून पुढे हा रस्ता क्रांती चौक उनणपूल ते चिकलठाणा व पुढे केंब्रीज चौकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. सार्वजनिक बाधंकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी जी. ट्वेंटीच्या वुमेन ट्वेंटी परिषदेनिमित्ताने गुळगुळीत केला होता. परंतु, त्यानंतर लागलीच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाले. दोन वेळा पॅचवर्कचे काम करूनही खड्डे कायम असल्याने कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.