

Tourists frustrated due to lack of guides
जे.ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: जागतिक वारसास्थळे असलेल्या जिल्ह्यात गाईडची वाणवा असल्याने देश विदेशांतील पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. आजमितीला २६ ते २७गाईड असून, त्यापैकी अर्धेअधिक गाईड वयाची ७० री पार केलेले आहेत. याचा विपरित परिणाम पर्यटनांवर होत असून, ही समस्या सोडवण्यसाठी गाईडची संख्या वाढवण्याबरोबरच एमटीडीसीच्या गाईडना मार्गदर्शन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे जसविंतसिंग यांनी पर्यटन विभागाच्या प्रादेशिक संचालकांकडे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागतिक वारसास्थळे असलेली अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या आहेत. त्याच बरोबर इतरही पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी दरवर्षी देशी विदेशी लाखो पर्यटक पर्यटनांसाठी येत असतात.
विदेशी पर्यटक येथील पर्यटनस्थळांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम गाईडची मागणी करतात. आजघडील वेरुळ आणि अजिंठा लेणीसाठी २६ ते २७ गाईड उपलब्ध आहेत. यातील ५० टक्के गाईड हे वयाची सत्तरी पार केलेले आहेत. त्यामुळे विदेशी पर्यटकांना गाईड मिळणे जिकरीचे बनले आहे. ही बाब पर्यटन विभाग गंभीरतेने घेत नसल्याने याचा विपरित परिणाम होत आहे.
डबल कामांमुळे तुटवडा
अनेक गाईड वेरूळ आणि अजिंठा अशा दोन ठिकाणी काम पाहतात. त्यामुळे पर्यटकांना गाईडचा तुटवडा जाणवत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रशिक्षित गाईडची संख्या वाढवावी त्याच बरोबर एमटीडीसीकडे प्रशिक्षित गाईड आहेत. त्यांना कार्यालया व्यतिरिक्त आवश्यक त्या पर्यटकांना गाईड करण्याची परवानगी दिली तर यावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास जसवंतसिंग यांनी व्यक्त केला.
ऑडिओ गाईडचा पर्याय
प्रमुख स्मारकांमध्ये उच्च-गुणवत्तेचे ऑडिओ गाईड्स बसवले तर पर्यटकांना याचा फायदा होणार आहे. विशेषतः जेव्हा प्रमाणित मार्गदर्शक उपलब्ध नसतात. यामुळे मर्यादित संख्येतील मार्गदर्शकांवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यटकांना अचूक आणि सुसंगत माहिती मिळेल याची खात्री होईल. अनेक परवानाधारक गाईड नोंदणीकृत टूर ऑपरेटर्सकडून कायदेशीर असाइनमेंट नाकारत आहेत. अशांवर तात्काळ कारवाई करण्याचीही जसवंतसिंग यांनी प्रादेशिक संचालकांकडे केली आहे.