

A case will be registered if a nylon manja is used
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात नायलॉन मांजाविरोधात पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरीत्या धडक मोहीम सुरू केली आहे.
यात गुरुवारी (दि. ११) नायलॉन मांजाचा वापर कराल तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन महापालिकेच्या घंटागाडीवरील भोंग्यांतून आणि स्मार्टसिटीने चौकाचौकांत उभारलेल्या सीसीटीव्हीवरील स्पिकरमधून करण्यात आले.
शहरात नायलॉन मांजामुळे गळा चिरून गंभीर इजा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या नायलॉन मांजामुळे काहींना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे या मांजाविरोधात शासनाने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.
त्यांच्या या मोहिमेत महापालिका आणि स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनही सहकार्य करीत आहे. या मोहीमेला अधिक प्रबळ करण्यासाठी महापालिकेने गुरुवारपासून त्यांच्या घंटागाडीवरुन प्रत्येक वसाहतींमध्ये नागरिकांनाआवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
यात नागरिकांनी नायलॉन मांजा वापरला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे घंटागाडीवरील भोंग्यातून सांगितले जात आहे. यासोबतच स्मार्टसिटीकडून शहरात चौकाचौकांत उभारलेल्या सीसीटीव्ही आणि स्पिकरचा आधार घेत त्यातून नागरिकांना हा मांजा वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.